मैदान गाजले युवा खेळाडूंच्या जोशाने! ,अमळनेर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; १४, १७ व १९ वर्षांखालील खेळाडूंचा सहभाग

अमळनेर प्रतिनिधी : क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद जळगाव तसेच अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर उत्साहपूर्ण, जोशपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात पार पडल्या.
या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. मैदानावर खेळाडूंचा जोश, प्रेक्षकांचा उत्साह आणि विविध क्रीडा प्रकारांतील चुरस यामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले होते.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार दादासाहेब अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच खा.शि.मं.चे कार्याध्यक्ष व सी.ए. भाऊसाहेब नीरज अग्रवाल, खा.शि.मं. समन्वय समितीचे चेअरमन योगेश मुंदडे, प्रताप कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. ए. के. अग्रवाल, डी.आर. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, श्री. नरेंद्र घोडपडे, तालुका क्रीडा अध्यक्ष व पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, क्रीडा समितीचे श्री. महेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते मैदानाची पूजा करून श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर स्पर्धेची मशाल प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांना औपचारिक सुरुवात करण्यात आली. विविध रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित खेळाडूंनी टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्घाटनानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत १०० मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली.
खेळातून शिस्त, एकात्मता आणि सुदृढ आरोग्याचा संदेश
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार अनिल पाटील यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, एकात्मतेची जाणीव आणि आत्मविश्वास निर्माण होतो. नियमित क्रीडा सहभागामुळे मानसिक बळ वाढते, शारीरिक चपळता निर्माण होते आणि शरीर निरोगी व सुदृढ राहते, असे त्यांनी सांगितले.
खेळाडूंनी मेहनत, सातत्य आणि शिस्तीला प्राधान्य देतानाच स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे आणि मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पंचांनी सांभाळली स्पर्धेची जबाबदारी
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी के. आर. बाविस्कर, कमलेश मोरे, गोकुळ बोरसे, जे. व्ही. बाविस्कर, बापूराव सांगोरे, प्रीतेश तुरणकर, नितीन पाटील, सुनील करंदीकर, मनोज पाटील, हिरालाल बाविस्कर, विनायक सूर्यवंशी, दर्शन पाटील, मयूर बारस्कर, सागर चावरिया, योगेश पाटील व राज जाधव यांनी पंच म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
क्रीडा शिक्षक, आयोजक, पंच, शिक्षक आणि स्वयंसेवकांच्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडल्या.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर तालुका कुस्ती-मल्लविद्या संघाची कार्यकारिणी जाहीर , ...
ज्यूडोच्या आखाड्यात कृष्णा महाजनची विजयी झेप; विभागात अव्वल,...
कॅरमच्या पटावर पी.बी.ए.च्या विद्यार्थ्यांचा जलवा; १७ वर्षे व...
विभागीय कुस्ती स्पर्धेत इंदिरा गांधी विद्यालयाचा दबदबा! क...
आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत 'इकरा थीम' कॉलेजचे यश; जळगा...
राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल...