शिवबांना डोक्यावर नाही, डोक्यात ठेवा!’; काव्यसंध्येतून गुंजन पाटलांचा समाजाला आरसा द्रौपदी, गांधारी आणि सीतेच्या प्रतिमेतून आजच्या समाजव्यवस्थेवर परखड भाष्य; अमळनेरातील काव्यसंध्येला रसिकांची तुडुंब गर्दी

‘अमळनेर प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवियत्री काव्यसंध्या मैफिलीत कवि गुंजन पाटील यांनी आपल्या ओजस्वी विचारांनी आणि प्रभावी कवितांनी उपस्थित रसिकांना अंतर्मुख केले. स्त्रीसुरक्षा, समाजाची बदलती मानसिकता, संस्कृती आणि महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या विषयांवर त्यांनी परखड भाष्य केले.
“आपण ज्या महापुरुषांना मानतो, त्यांच्या पुतळ्यांना हार घालण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात स्थान देणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांना डोक्यावर ठेवण्यापेक्षा डोक्यात ठेवले पाहिजे,” असे सांगत गुंजन पाटील यांनी समाजातील ढोंगीपणावर प्रखर प्रहार केला.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असतांना समाज गप्प का राहतो? रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज तेव्हा का जाणवत नाही? आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी केवळ महिलांचीच आहे का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी त्यांनी सादर केलेल्या कवितेत “रोज रावण नवीन रूप धारण करून येतो, गरीब सीता कुठवर वाचेल?” असा सवाल करत स्त्रीच्या असुरक्षिततेचे विदारक वास्तव मांडले. तसेच, “तुम्ही रस्त्यावर तमाशा बघत बसता, म्हणून कोणीही द्रौपदीचे वस्त्रहरण करून जातो,” या आशयातून समाजाच्या निष्क्रियतेवर त्यांनी भाष्य केले.
महाभारतातील गांधारीच्या प्रतिमेचा संदर्भ देत त्यांनी आजच्या समाजातील उदासीनतेवरही भाष्य केले. “घराघरात एक गांधारी डोळ्यांवर पट्टी बांधून बसली आहे,” या प्रभावी मांडणीतून अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
‘मला आई व्हायचं नाही’ कवितेतून स्त्रीजीवनाचा आरसा
गुंजन पाटील यांनी ‘मला आई व्हायचं नाही’ ही कविता सादर करत मुलगा आणि मुलगी यांच्या संगोपनातील भेदभावावर भाष्य केले. पाहुणे घरी आले की मुलीला स्वयंपाकघरात मदतीसाठी बोलावले जाते, तर मुलाला बाहेर खेळायला पाठवले जाते. अशा छोट्या-छोट्या कृतींतून मुलींना लहानपणापासूनच ‘चांगली पत्नी आणि चांगली आई’ होण्याचे प्रशिक्षण दिले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
“मुलीला केवळ चांगली पत्नी किंवा चांगली आई बनविण्याऐवजी स्वतःच्या अधिकारांसाठी ठामपणे उभी राहणारी सक्षम व्यक्ती बनवा,” असा संदेश त्यांनी पालकांना दिला.
आपल्या कवितांमधून त्यांनी स्त्रीच्या मनातील वेदना, अपेक्षा, त्याग, स्वाभिमान आणि तिच्या ‘मीपणा’चा शोध मांडला. त्यांच्या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी त्यांनी प्रेमकवितांसह विविध सामाजिक आशयाच्या कविता सादर करून मैफिलीला वेगळीच रंगत आणली.
श्रोत्यांची तुडुंब गर्दी; उभे राहून दिली कवितांना दाद
कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात श्रोत्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडल्याने अनेक रसिकांनी उभे राहून संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आणि कवितांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाला आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, आयोजक विक्रांत पाटील, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, नगरसेविका जयश्री पाटील , डॉक्टर अविनाश जोशी ,डॉक्टर अनिल शिंदे ,जितेंद्र पारेख पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम ,चेतन राजपूत निरज अग्रवाल,सह मान्यवर उपस्थित होते..
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अहिराणी कवी शरद धनगर यांनीही आपल्या खास शैलीत कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची प्रस्ताव प्रस्ताविक कार्यक्रमाचे आयोजक मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केले .यावेळी आमदार अनिल पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. सामाजिक जाणीव, स्त्रीसन्मान आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारी ही काव्यसंध्या अमळनेरकर रसिकांसाठी संस्मरणीय ठरली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेविका स्वप्न विक्रांत पाटील
गौतम पाटील सुनील भोई, भूषण महाजन ,अक्षय साळी,यश वर्मा,विजय राजपूत, वरूण पाटील, शरद धनगर यांनी प्रयत्न केले
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
गझलेची मैफल, साहित्यिकांच्या भेटीगाठी अन् आठवणींचा सुंदर प्र...
नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "सम...
दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकार...
अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळत...
गझलेच्या दोन ओळींत उमटतो समाजाच्या वेदनांचा हुंकार! , ‘गझ...
ज्ञानाची सरस्वती, सेवाभावाची शक्ती अन् नेतृत्वाची दुर्गा! ...