साळवा फाट्यावर विद्यार्थ्यांचा संताप; एसटी बसेस थांबविण्याची मागणी , ▪️बसेस न थांबल्यास विद्यार्थी व शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलनाचा इशारा
![]()
*
साळवा फाट्यावर विद्यार्थ्यांचा संताप; एसटी बसेस थांबविण्याची मागणी
▪️बसेस न थांबल्यास विद्यार्थी व शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलनाचा इशारा
धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील)
धरणगाव : साळवा फाटा येथे गेल्या तीन महिन्यांपासून एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी शिवसेना उबाठाचे धरणगाव तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली साळवा फाट्यावर जोरदार निदर्शने करीत एसटी महामंडळाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. साळवा, साकरे, निशाणे व गोंदेगाव या परिसरातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण तसेच विविध अभ्यासक्रमांसाठी चोपडा, धरणगाव व जळगाव येथे दररोज प्रवास करतात. मात्र साळवा फाट्यावर एसटी बसेस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर महाविद्यालयात पोहोचणे कठीण झाले आहे. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बससेवा सुरळीत करण्याबाबत वारंवार मागणी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे आता प्रशासनाने तातडीने दखल घेऊन साळवा फाट्यावर नियमित एसटी बसेस थांबवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
*’बसेस थांबवा, अन्यथा रास्तारोको!’*
याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन एसटी बसेस साळवा फाट्यावर थांबविण्यात आल्या नाहीत, तर विद्यार्थी व शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांनी दिला. यावेळी पालकांसह अर्चिता पाटील, दीक्षा भिल, दुर्गेश्वरी पाटील, धनश्री पाटील, दिव्या पाटील, हर्षदा पाटील, गौरव पाटील, हेमेश पाटील, कपिल पाटील, गौरव पारधी, कीर्तन गुजर, निखिल पाटील, हितेश कुंभार, नरेंद्र कुंभार, प्रेमचंद अत्तरदे, दीपक पाटील, नरेंद्र पाटील, विनोद पाटील, अनिकेत पाटील, भावेश पाटील, ज्ञानेश्वर सोनार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न असल्याने एसटी प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहून तातडीने बसथांबा पूर्ववत करावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

