गरीब विद्यार्थ्यांच्या पावलांना दिला सुखाचा आधार!  ,पाटील दाम्पत्याचा संवेदनशील उपक्रम; ३५ विद्यार्थ्यांना दर्जेदार पादत्राणे व कपकेक वाटप
1 min read

गरीब विद्यार्थ्यांच्या पावलांना दिला सुखाचा आधार! ,पाटील दाम्पत्याचा संवेदनशील उपक्रम; ३५ विद्यार्थ्यांना दर्जेदार पादत्राणे व कपकेक वाटप

Loading

गरीब विद्यार्थ्यांच्या पावलांना दिला सुखाचा आधार!

पाटील दाम्पत्याचा संवेदनशील उपक्रम; ३५ विद्यार्थ्यांना दर्जेदार पादत्राणे व कपकेक वाटप

बोदर्डे, ता. पारोळा प्रतिनिधी
गरीब आणि गरजू बालकांच्या पायाला लागणारा चटका व टोचणारा काटा हा प्रत्येक संवेदनशील मनाला लागला पाहिजे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी दामिनी चौधरी यांनी केले.
अमळगाव, ता. अमळनेर येथील मूळ रहिवासी प्रमोद राजेंद्र पाटील, वरिष्ठ यांत्रिक, वेस्टर्न रेल्वे, मुंबई आणि त्यांच्या पत्नी चेतना प्रमोद पाटील, महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे हे दाम्पत्य सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. चेतना पाटील यांचे शिक्षण एम.ए., डी.एड. झाले असून त्यांचा पिंड शिक्षिकेचा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांविषयी त्यांना विशेष आत्मीयता आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोदर्डे येथील विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ पाहताना तसेच मुख्याध्यापिका सुषमा पाटील व उपशिक्षिका माधुरी पवार यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती घेतल्यानंतर, शाळेतील आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली.

याच भावनेतून त्यांची मुलगी कु. हरीश्री प्रमोद पाटील हिच्या दहाव्या वाढदिवसाचा खर्च टाळून तो गरजू विद्यार्थ्यांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हरीश्रीने स्वतःच आपल्या आई-वडिलांना, “माझ्या वाढदिवसाचा खर्च न करता गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करूया,” अशी इच्छा व्यक्त केली. तिच्या या विचाराला पालकांनी कृतीची जोड दिली आणि बोदर्डे जिल्हा परिषद शाळेतील सर्व ३५ विद्यार्थ्यांना उच्च प्रतीची पादत्राणे व कपकेक देण्यात आले.

नवीन पादत्राणे मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थितांचे मनही भरून आले. एखाद्या मुलाच्या पायाला चप्पल मिळणे ही कदाचित छोटी गोष्ट वाटेल; पण त्या बालकाच्या चेहऱ्यावरचे समाधान हीच त्या दातृत्वाची खरी श्रीमंती आहे.

विशेष म्हणजे, पाटील दाम्पत्याने नुकतेच नानासाहेब खंडेराव पाटील मूकबधिर निवासी शाळा, देवगाव येथील सर्व विद्यार्थ्यांनाही पादत्राणे दिली, तर परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथील सर्व बालकांना मिष्टान्न भोजनाचा लाभ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.

पालकांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा मुलांमध्येही रुजते, याचे सुंदर उदाहरण कु. हरीश्रीच्या उपक्रमातून पाहायला मिळाले. सामाजिक बांधिलकीची ही संस्कारांची शिदोरी निश्चितच कौतुकास्पद आहे.
पाटील दाम्पत्याच्या या संवेदनशील सामाजिक कार्याचे गटशिक्षणाधिकारी दामिनी चौधरी यांनी कौतुक करून अभिनंदन केले, तर मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *