वैवाहिक जीवनाची सुरुवात सामाजिक बांधिलकीने; अमळनेरच्या तरुण वकील दांपत्याने रक्तदानासह केला अवयवदानाचा संकल्प , ॲड. सारांश व ॲड. पूजा यांचा साधेपणाने विवाह साजरा; लग्नाचा आनंद समाजोपयोगी कृतीशी जोडण्याचा प्रयत्न
![]()
वैवाहिक जीवनाची सुरुवात सामाजिक बांधिलकीने; अमळनेरच्या तरुण वकील दांपत्याने रक्तदानासह केला अवयवदानाचा संकल्प
ॲड. सारांश व ॲड. पूजा यांचा साधेपणाने विवाह साजरा; लग्नाचा आनंद समाजोपयोगी कृतीशी जोडण्याचा प्रयत्न
अमळनेर प्रतिनिधी
: अमळनेर येथील तरुण वकील आणि वक्ते ॲड. सारांश धनंजय सोनार यांनी ॲड. पूजा विजय सुरसुरे यांच्यासोबत आपल्या लग्नजीवनाचा प्रारंभ सामाजिक उपक्रमाने करण्याचा निर्णय घेतला. आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात केवळ आनंद आणि उत्सवाने न करता ती एका अर्थपूर्ण सामाजिक कृतीने व्हावी, या विचारातून त्यांनी आपल्या विवाहाचा आनंद सामाजिक बांधिलकीशी जोडला आहे.
२७ ऑगस्ट रोजी ॲड. सारांश यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झालेल्या या दांपत्याने विवाहाच्या निमित्ताने आधी ‘रक्तदान’ केले. तसेच भारत सरकारच्या NOTTOच्या अधिकृत प्रणालीवर अर्ज दाखल करत मृत्युपश्चात अवयवदानाची इच्छा नोंदवत संकल्पही केला.
याबाबत बोलताना ॲड. सारांश सोनार आणि ॲड. पूजा सुरसुरे म्हणाले, “विवाह हा आमच्या दोघांच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात आहे. या नव्या सुरुवातीची आठवण केवळ आमच्यापुरती मर्यादित न राहता ती समाजासाठीही अर्थपूर्ण ठरावी, अशी आमची इच्छा होती. विवाह हा केवळ दोन व्यक्तींच्या सहजीवनाची सुरुवात नसून, समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी व्यक्त करण्याचीही एक संधी आहे. त्यामुळे विवाहाच्या निमित्ताने प्रथम रक्तदान आणि त्यासोबतच अवयवदानाचा संकल्प करण्याचा निर्णय घेतला.”
*“विवाहनिमित्ताने अवयवदानाचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता यावे, अशी आमची इच्छा आहे. मृत्यूनंतर अवयवदान व रक्तदानाच्या माध्यमातून इतरांना नवजीवनाची संधी मिळू शकते. त्यामुळे अवयवदान व रक्तदानातून गरजू व्यक्तीला मदत मिळू शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र देशात अवयवदानाचे प्रमाण अद्याप अत्यल्प असल्याने अवयवदानाबाबत समाजात अधिक व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगत त्यासाठी सामाजिक संघटनांच्या खांद्याला खांदा लाऊन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सागितले*.
सोबतच वैदीक, धार्मिक, वा नोंदणी, पद्धतीचाविवाह असो तो सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा, अशी इच्छा असल्याने नवरा-नवरीने रक्तदान करत विवाहसोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. या माध्यमातून विवाहाच्या निमित्ताने एक वेगळा आणि सकारात्मक पायंडा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
यानिमित्ताने जळगावचे जिल्हाधिकारी आय. ए. एस. रोहन घुगे यांनी नवदांपत्यास शुभेच्छा कळविल्या आहेत.
या विवाहपर्व च्या आनंदीआयुष्याची सुरुवात रक्तदान आणि अवयवदाना सारख्या सामाजिक उपक्रम संकल्पाने करणाऱ्या या तरुण वकील दाम्पत्याने सामाजिक बांधिलकीचा संदेश दृढ करत समाजोपयोगी उपक्रमांचा पायंडा घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

