देवगाव-देवळीमध्ये स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष; महात्मा फुले हायस्कूलमध्ये देशभक्तीचा जागर
![]()
देवगाव-देवळीमध्ये स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष; महात्मा फुले हायस्कूलमध्ये देशभक्तीचा जागर
अमळनेर प्रतिनिधी
देवगाव-देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देवगाव-देवळी एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब धर्मराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन स्काऊट शिक्षक एस. के. महाजन यांनी केले. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत व राष्ट्रगीत सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागवली.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमापूर्वी सकाळी गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.
कार्यक्रमास देवगाव-देवळी एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक आय. आर. महाजन, एच. ओ. माळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील व संभाजी पाटील यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, देशभक्तीपर वातावरण आणि ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती यामुळे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला.


