शिक्षक संघाच्या आंदोलनाला तूर्त स्थगिती; २० ऑगस्टपूर्वी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर शिक्षणाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा; १५ ऑगस्टचे नियोजित आंदोलन आठ दिवसांसाठी स्थगित
![]()
शिक्षक संघाच्या आंदोलनाला तूर्त स्थगिती; २० ऑगस्टपूर्वी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर शिक्षणाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा; १५ ऑगस्टचे नियोजित आंदोलन आठ दिवसांसाठी स्थगित
जळगाव प्रतिनिधी — महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन)च्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत होणारी अडवणूक तसेच दप्तर दिरंगाईच्या प्रश्नांवर १५ ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज, १३ ऑगस्ट २०२६ रोजी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या कार्यालयात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित कामांबाबत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यालयातील प्रलंबित सर्व प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या.
तसेच, २० ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा बैठक घेण्यात येणार असून, त्यापूर्वी प्रलंबित सर्व प्रकरणे निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले. त्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्याची विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यासंदर्भात लेखी पत्रही देण्यात आले.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन)ने १५ ऑगस्टपासून नियोजित बेमुदत आंदोलन तूर्त आठ दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता २० ऑगस्टच्या बैठकीत प्रलंबित प्रश्न कितपत मार्गी लागतात, याकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बैठकीस एस. डी. भिरुड, प्रा. सुनील गरुड, डीगंबर पाटील, जी. एन. पाटील, जे. पी. सपकाळे, सिद्धेश्वर वाघूळदे, आर. आर. धनगर, अरुण सपकाळे, डी. ए. पाटील, गोपाळ पाटील, आर. डी. चौधरी, गिरीश भारंबे, एस. के. पाटील, बाळासाहेब पाटील, सी. एस. चौधरी, अजित पाटील, टी. बी. पांढरे, व्ही. एस. रोकडे, आर. बी. महाजन, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

