अभिनव विद्यामंदिरात प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन
1 min read

अभिनव विद्यामंदिरात प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन

Loading

अभिनव विद्यामंदिरात प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन

ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी) :
छत्रपती शिक्षण मंडळ संचलित अभिनव विद्यामंदिर, पारनाका, कल्याण (पश्चिम) आणि ज्ञानदा प्लंबिंग गुरुकुल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या दोन महिन्यांच्या प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार मा. श्री. नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री. ना. के. फडके हे होते.

यावेळी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा यांनी शुभेच्छा संदेश पाठवून या अभिनव च्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले तसेच युवकांच्या कौशल्य विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक मा. श्री. संपत आनंदा गिते यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, या प्रशिक्षणामुळे कल्याण परिसरातील युवकांना दर्जेदार कौशल्य शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि हमखास रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

यानंतर ज्ञानदा प्लंबिंग गुरुकुलचे संचालक मा. श्री. मिलिंद डांगे यांनी प्रशिक्षण अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ज्ञानदा प्लंबिंग गुरुकुलच्या या उपक्रमात अभिनव विद्यामंदिर, पारनाका हे दहावे प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत झाले आहे.

या प्रशिक्षणाची विशेष बाब म्हणजे हा दोन महिन्यांचा निवासी कौशल्य विकास अभ्यासक्रम आहे. पहिल्या महिन्यात अभिनव विद्यामंदिर, कल्याण येथे विद्यार्थ्यांना प्लंबिंगचे सखोल ज्ञान, आधुनिक उपकरणांचा वापर आणि प्राथमिक प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात पुणे येथील ज्ञानदा प्लंबिंग गुरुकुल येथे प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणात प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळून रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी अधिक सुलभ होतील.

या समारंभास माजी आमदार मा. श्री. नरेंद्र पवार, ज्ञानदा प्लंबिंग गुरुकुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अभय थिटे, संचालक मा. श्री. मिलिंद डांगे, जनसंपर्क अधिकारी मा. श्री. सोमनाथ कुलकर्णी, कल्याण जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष मा. श्री. मोहन आघारकर, कल्याण जनता सहकारी बँकेचे संचालक मा. डॉ. श्री. चंद्रशेखर तांबडे, नगरसेवक मा. श्री. अमित धाक्रस यांच्यासह संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मा. श्री. मिलिंद कुलकर्णी तसेच शालेय समिती सदस्य मा. श्री. बाबा जोशी, मा. श्री. विवेक वाणी आणि मा. श्री. शरद चासकर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात “कौशल्यातून रोजगार आणि रोजगारातून आत्मनिर्भरता” हा संकल्प साकार करण्यासाठी अशा प्रकारचे कौशल्याधारित प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे युवकांना उद्योगविश्वात प्रवेश करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या रोजगारक्षमतेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रमास स्थानिक लोक, माजी मुख्याध्यापक , शिक्षक , विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात, दिमाखदार आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *