मुंबई महापौर चषक पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडेची दमदार कामगिरी; ‘स्ट्राँग मॅन’ किताबासह सुवर्णपदक पटकावले,१०७ किलो वजनी गटात १७० किलो बेंच प्रेस उचलून प्रथम क्रमांक; सर्व स्पर्धकांमधून ‘बेस्ट लिफ्टर’ म्हणूनही गौरव
![]()
मुंबई महापौर चषक पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडेची दमदार कामगिरी; ‘स्ट्राँग मॅन’ किताबासह सुवर्णपदक पटकावले
१०७ किलो वजनी गटात १७० किलो बेंच प्रेस उचलून प्रथम क्रमांक; सर्व स्पर्धकांमधून ‘बेस्ट लिफ्टर’ म्हणूनही गौरव
अमळनेर | प्रतिनिधी
दि पॅरालिम्पिक पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित ५ व्या महापौर चषक पॅरा पॉवरलिफ्टिंग मुंबई जिल्हा (आमंत्रित) अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये अमळनेरचा होतकरू खेळाडू दिनेश शशी बागडे याने उल्लेखनीय यश संपादन करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
दि. २८ जून २०२६ रोजी बोरिवली (पश्चिम), मुंबई येथे झालेल्या या स्पर्धेत १०७ किलो वजनी गटात १७० किलो बेंच प्रेस उचलून दिनेश बागडे याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच स्पर्धेतील सर्व स्पर्धकांमधून त्याची ‘बेस्ट लिफ्टर’ म्हणून निवड करण्यात आली असून त्याला प्रतिष्ठेचा ‘स्ट्राँग मॅन’ किताब, पदक, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
दिनेश बागडे याने यापूर्वीही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले असून तो दोन वेळा ‘खेलो इंडिया’ पदक विजेता, चार वेळा राष्ट्रीय पदक विजेता, सहा वेळा राज्यस्तरीय पदक विजेता तसेच ओपन पॉवरलिफ्टिंगमध्ये सहा वेळा ‘बेस्ट लिफ्टर – स्ट्राँग मॅन’ ठरला आहे. त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे अमळनेरचे नाव राज्यासह राष्ट्रीय स्तरावरही उज्ज्वल झाले आहे.
त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल अमळनेर शहरातील मित्रपरिवार, क्रीडाप्रेमी, विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

