देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न
![]()
देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज नवीन मराठी शाळेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळी ठीक ८:०० वाजता शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे पूजन करून रॅलीला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज आणि देशभक्तीपर संदेशांचे फलक धरले होते. “वंदे मातरम्” आणि “भारत माता की जय” या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता. रॅलीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी आदर निर्माण करणे आणि घरोघरी तिरंगा फडकवण्याचा संदेश देणे हा होता.अमळनेर शहराच्या वड चौक, बडगुजर मंगल कार्यालय मार्गे मुख्य बाजारातून फिरून रॅलीचा समारोप शाळेच्या मैदानावर झाला. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शाळेच्या या उपक्रमाचे नागरिकांनी आणि पालकांनी विशेष कौतुक केले.

