जिद्दीला सुरांची साथ… देवगावच्या अभिषेकची भारतीय नौदलात संगीतकार म्हणून दमदार भरारी!, शेतकरी कुटुंबातील मितभाषी युवकाने कठोर निवड प्रक्रिया पार करत साकारले आई-वडिलांचे स्वप्न; गावात जल्लोषात स्वागत
![]()
जिद्दीला सुरांची साथ… देवगावच्या अभिषेकची भारतीय नौदलात संगीतकार म्हणून दमदार भरारी!
शेतकरी कुटुंबातील मितभाषी युवकाने कठोर निवड प्रक्रिया पार करत साकारले आई-वडिलांचे स्वप्न; गावात जल्लोषात स्वागत
अमळनेर | प्रतिनिधी
परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मनात जिद्द, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती प्रामाणिक मेहनत असेल तर यशाचा मार्ग नक्की खुला होतो, याची प्रेरणादायी प्रचिती देवगाव देवळी येथील अभिषेक गोकुळ पाटील याने दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा हा अत्यंत शांत, मितभाषी आणि अभ्यासू माजी विद्यार्थी भारतीय नौदलात MR (संगीतकार) पदासाठी निवडला गेल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी कुटुंबातील अभिषेकने बारावीपर्यंत शिक्षण घेत असतानाच संगीताची आवड जोपासली. अमळनेर तालुक्यातील शिरूड खान्देश बँडमध्ये गायक म्हणून काम करत त्याने गायन आणि किबोर्ड (पियानो) वादनाचा सातत्याने सराव केला. त्याच्या मेहनतीला अखेर यश मिळाले आणि भारतीय नौदलाच्या संगीतकार भरतीत त्याने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या कलेला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले.
३ जून २०२६ रोजी झालेल्या भरती प्रक्रियेत अभिषेकने शारीरिक चाचणी (Physical Test), लेखी परीक्षा, म्युझिक टेस्ट, वैद्यकीय तपासणी (Medical Test) आणि अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) अशा सर्व टप्प्यांत यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत नेव्ही नगर, कुलाबा (मुंबई) येथे भारतीय नौदलाच्या MR (संगीतकार) पदासाठी अंतिम निवड मिळवली. या यशामुळे त्याने आई-वडिलांचे स्वप्न साकार करत गावाचा मान उंचावला आहे.
देवगाव देवळी येथे सुरू असलेल्या ‘संघर्ष अभ्यासिका’ उपक्रमामुळे अनेक युवक-युवती विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत यश मिळवत आहेत. नुकतीच यशस्वी पाटील व तेजस पाटील या भाऊ-बहिणींच्या यशानंतर आता अभिषेकच्या निवडीमुळे गावात आनंदाची आणखी एक पर्वणी आली. मित्रमंडळी व ग्रामस्थांनी जल्लोषात मिरवणूक काढून त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.
अभिषेकचे यशाबद्दल गावातील शिक्षणप्रेमी नागरिक, मित्रपरिवार, महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे चेअरमन विलासराव पाटील, संचालक मंडळ, मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले. यापूर्वी विविध शासकीय सेवांमध्ये कार्यरत झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनही त्याला लाभले.
अभिषेकचे यश हे ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी परिस्थिती नव्हे, तर जिद्दच यशाचा खरा मार्ग ठरते,” हा संदेश त्याच्या यशातून अधोरेखित झाला आहे.

