ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त औषधी वनस्पती माहिती पोस्टर प्रदर्शन उत्साहात*
1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त औषधी वनस्पती माहिती पोस्टर प्रदर्शन उत्साहात*

Loading

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त औषधी वनस्पती माहिती पोस्टर प्रदर्शन उत्साहात

जळगांव प्रतिनिधी

जळगाव दि. २९/०६/२०२६: के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने ‘औषधी वनस्पती माहिती पोस्टर प्रदर्शन’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये औषधी वनस्पतींचे महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म, पर्यावरण संरक्षणाची जाणीव तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रदर्शनात इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध औषधी वनस्पतींवरील माहितीपूर्ण व आकर्षक पोस्टर्स तयार केली. प्रत्येक पोस्टरमध्ये संबंधित वनस्पतीची शास्त्रीय माहिती, औषधी उपयोग, पर्यावरणीय महत्त्व तसेच मानवी आरोग्याशी असलेले नाते प्रभावीपणे मांडण्यात आले. प्रदर्शनासाठी एकूण ५८ माहितीपूर्ण पोस्टर्स सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांच्या हस्ते ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रतिभा लोहार व श्रीमती सुचिता बाविस्कर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्ती, अभ्यासपूर्ण मांडणी आणि सर्जनशीलतेचे कौतुक करत औषधी वनस्पतींचे संवर्धन व पर्यावरण संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता आणि स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनाची प्रेरणा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेमध्ये अविनाश वांगेकर याने प्रथम क्रमांक, चिराग पाटील याने द्वितीय क्रमांक तर भार्गव जेऊघाले याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कु. अनुष्का प्रवीण वाघारी, कु. रेणुका सचिन परदेशी आणि कु. जीविका मोहन पाटील या विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन विज्ञान विषयाचे शिक्षक श्रीमती पूनम कोल्हे, श्री. बिपिन झोपे, श्रीमती रोहिणी पाटील, श्रीमती दिपाली खडके, श्रीमती नूतन वराडे, श्रीमती ज्योती पाचपांडे, श्रीमती खुशबू चौधरी व श्रीमती प्राजक्ता देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतींची माहिती संशोधनपूर्वक संकलित करून आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींची ओळख, त्यांचे औषधी व पर्यावरणीय महत्त्व समजले. तसेच संशोधन, माहिती संकलन, सादरीकरण कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली. स्थानिक औषधी वनस्पतींचे जतन व संवर्धन करण्याची प्रेरणाही विद्यार्थ्यांना मिळाली.
पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी, ज्ञानवर्धक व यशस्वी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *