ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त ‘माझी जिजाऊ, माझी आई’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त ‘माझी जिजाऊ, माझी आई’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
जळगाव, दि. १७ जून २०२६ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी “माझी जिजाऊ, माझी आई” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मातृभक्ती, संस्कारमूल्ये, स्त्रीशक्तीबद्दल आदरभाव तसेच राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे तसेच पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे, जेष्ठ शिक्षिका प्रतिभा लोहार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन सौ. सुचिता बाविस्कर, श्री. आर. एन. तडवी व श्री. पी. आर. राणे यांनी केले. इयत्ता पाचवीतील एकूण २५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राजमाता जिजाऊंचे कार्य, त्यांचे दूरदर्शी विचार, छत्रपती शिवाजी महाराजांवर झालेले संस्कार तसेच आपल्या आईबद्दलच्या भावना प्रभावी शब्दांत व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वातून जिजाऊंच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाबद्दलचा आदर, मातृभक्ती आणि संस्कारमूल्यांची जाणीव प्रकर्षाने दिसून आली.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंचे चरित्र, मातृत्वाचे महत्त्व आणि कुटुंबातील आईची भूमिका याविषयी प्रभावी मनोगते सादर केली. विद्यार्थ्यांच्या ओघवत्या व आत्मविश्वासपूर्ण वक्तृत्वामुळे उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला कु. सोहाली गोपाळ चौधरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला, तर पार्थ पंकज सोनार याने द्वितीय क्रमांक मिळविला कु. शिरीन शमीर तडवी हिने तृतीय क्रमांक संपादन केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श विचारांचे अनुकरण करून चारित्र्यसंपन्न व जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचा विकास होण्यासोबतच इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांविषयी अभिमान, मातृभक्तीची भावना आणि संस्कारांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यास मदत होते, असे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे कुशल सूत्रसंचालन श्री. पराग राणे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी विद्यालय सातत्याने विविध उपक्रम राबवत असून राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कृतज्ञता, मातृप्रेम आणि राष्ट्राभिमान जागृत करणारा ठरला.

