प्रतिभा जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव
![]()
प्रतिभा जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव
शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल
अमळनेर प्रतिनिधी :
जळगाव येथे रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली तथा प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका तथा माध्यमिक विद्यालय लोनग्रुप येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रतिभा देवराम जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
जळगाव येथील अल्पबचत भवनात संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थीकेंद्री उपक्रम, सामाजिक बांधिलकी जपत केलेले योगदान तसेच सहकार क्षेत्रातील सक्रिय सहभाग याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्रकार ईश्वर महाजन यांच्याशी संवाद साधतांना श्रीमती प्रतिभा जाधव म्हणाल्या, “वर्गखोलीच्या चार भिंतींना जेव्हा ज्ञानमंदिराचे स्वरूप प्राप्त होते, तेव्हा तेथे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवले जात नाहीत, तर चारित्र्य, संस्कार आणि मूल्याधिष्ठित जीवनाचे शिल्प घडविले जाते. अध्यापन ही केवळ ज्ञानदानाची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रेरणा आणि आत्मविश्वासाची बीजे रुजविण्याचे कार्य आहे.” त्यांच्या या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या सोहळ्यास शिक्षक आमदार सत्यजित तांबे, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, महाराष्ट्र सल्लागार प्रदीप सोनवणे, विराज कावडीया, रणजित सोनवणे, एच. जी. इंगळे, गोविंदा पाटील व जितेंद्र बोरसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
श्रीमती प्रतिभा जाधव यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव दिलीप पाटील, उपाध्यक्षा योगश्री पाटील तसेच मंडळाचे पदाधिकारी, मित्रपरिवार व नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या प्रतिभा जाधव यांच्या या यशामुळे अमळनेर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

