“शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आ. सत्यजित तांबे आक्रमक” २१ मेची बैठक ठरणार निर्णायक; तोडगा न निघाल्यास २५ मेपासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा
![]()
“शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आ. सत्यजित तांबे आक्रमक”
२१ मेची बैठक ठरणार निर्णायक; तोडगा न निघाल्यास २५ मेपासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा
नाशिक | प्रतिनिधी
राज्यातील शिक्षण विभागात वाढत चाललेला भ्रष्टाचार, मनमानी कारभार, रखडलेली प्रशासकीय कामे आणि शिक्षक-विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांनी जोरदार एल्गार पुकारला आहे. उत्तर महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शनिवारी नाशिक येथे पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आ. तांबे यांनी शिक्षण विभागातील अनागोंदीवर तीव्र संताप व्यक्त करत सरकार आणि प्रशासनाला थेट इशारा दिला.
आ. तांबे म्हणाले की, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सुरू असलेल्या शिक्षण व्यवस्थेत गंभीर गोंधळ निर्माण झाला आहे. अनुदानातील विलंब, संचमान्यतेतील वारंवार बदल, शिक्षक भरतीतील अडथळे, जुनी पेन्शन योजना, विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड संलग्नीकरणातील त्रुटी आणि प्रशासकीय निर्णयांतील मनमानीमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण संस्था मोठ्या संकटात सापडल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
“उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. अनेक अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया सुरू असून काही अधिकारी तुरुंगात आहेत. शालार्थ आयडी प्रकरणानंतर सुरू झालेल्या एसआयटी चौकशीमुळे संपूर्ण विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. अधिकारी कुठल्याही फाईलवर सह्या करण्यास टाळाटाळ करत असल्याने शिक्षक आणि संस्थांची कामे रखडली आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रात्यक्षिकांच्या बॅचची संख्या २० वरून थेट ४० करण्यात आल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “कोणताही अभ्यास, तज्ज्ञांचा सल्ला किंवा वास्तव परिस्थितीचा विचार न करता निर्णय घेतले जात आहेत. संचमान्यतेचे नियम वारंवार बदलून शिक्षक पदे कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी दाखवली जाते आणि त्याचा थेट परिणाम शिक्षक पदांवर होत आहे,” असेही ते म्हणाले.
धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत विविध प्रश्न मांडले. २१ मे रोजी पुणे येथे शिक्षण आयुक्तांसोबत बैठक होणार असून त्यात समाधानकारक निर्णय न झाल्यास २५ मेपासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा आ. तांबे यांनी दिला. “१५ जूनपूर्वी प्रश्न निकाली निघाले नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन उभे राहील,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
बैठकीस शिक्षक नेते एस. डी. भिरुड, प्रा. सुनील गरुड, यू. यू. दादा पाटील, अण्णासाहेब जे. के. पाटील, संभाजी अप्पा पाटील, सी. सी. वाणी, एस. के. पाटील, डी. ए. पाटील, एच. जी. इंगळे, संजय निकम, जे. पी. सपकाळे, तुषार बोरसे, डिगंबर पाटील, योगेश भोईटे यांच्यासह विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जळगाव जिल्हा ज्युनिअर कॉलेज संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेश राणे हे देखील प्रतिनिधी म्हणून बैठकीस उपस्थित होते.
दरम्यान, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या अध्यक्षपदी शैलेश राणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

