सहकार, शिक्षण आणि समाजकारणातील कार्याला जागतिक गौरव , बापुसाहेब अशोक खलाणे यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका कडून मानद डी.लिट. पदवी प्रदान
1 min read

सहकार, शिक्षण आणि समाजकारणातील कार्याला जागतिक गौरव , बापुसाहेब अशोक खलाणे यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका कडून मानद डी.लिट. पदवी प्रदान

Loading

सहकार, शिक्षण आणि समाजकारणातील कार्याला जागतिक गौरव

मा. बापुसाहेब अशोक खलाणे यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका कडून मानद डी.लिट. पदवी प्रदान

चाळीसगाव प्रतिनिधी :
शिक्षण, सहकार, समाजसेवा आणि पुरोगामी विचारांचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ, साने गुरुजी पगारी नोकर पतसंस्था, सम्राट अशोक ज्ञानप्रबोधिनी तसेच दि मॉडर्न को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, चाळीसगाव या संस्थांचे संस्थापक मा. बापुसाहेब अशोक हरी खलाणे यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा मुजरा मिळाला आहे.

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका (बोलिव्हीया) यांनी डॉ. राधाकृष्णन टीचर्स वेल्फेअर असोसिएशन व ऑल इंडिया टीचर्स असोसिएशन, वसंतकुंज, नवी दिल्ली यांच्या शिफारशीनुसार मा. खलाणे यांना मानद डॉक्टरेट पदवी (डी.लिट.) बहाल करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

मा. खलाणे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक अभिनव व व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या. विशेषतः चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या संस्थांमुळे अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या असून अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे.

सहकार क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान देत बँक व पतसंस्थांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले. व्यवसाय उभारणी, घर खरेदी, मुलांचे शिक्षण, मुलींचे विवाह अशा विविध कारणांसाठी त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अनेक कुटुंबांसाठी त्यांच्या संस्था आधारवड ठरल्या आहेत.

राजकीय क्षेत्रातही मा. खलाणे यांनी पुरोगामी विचारसरणी जोपासत फुले-शाहू-आंबेडकरांच्या समतावादी आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रसार केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या या बहुआयामी कार्याचा गौरव म्हणून मिळालेल्या मानद डी.लिट. पदवीमुळे चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवार, विविध संस्थांचे सभासद, कर्मचारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *