साहित्यसृष्टीत भर; सतीश पाटील यांच्या दोन दर्जेदार ग्रंथांचे भव्य प्रकाशन , नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात ‘मेहनतीचे मोल’ व ‘क्रांतीसूर्य’ ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
![]()
साहित्यसृष्टीत भर; सतीश पाटील यांच्या दोन दर्जेदार ग्रंथांचे भव्य प्रकाशन
नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात ‘मेहनतीचे मोल’ व ‘क्रांतीसूर्य’ ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
अमळनेर प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील भाटेवाडी येथे आयोजित नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात साहित्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरावी अशी घटना घडली. पारोळा येथील ज्येष्ठ शिक्षक व साहित्यिक श्री सतीश दशरथ पाटील यांच्या ‘मेहनतीचे मोल’ आणि ‘क्रांतीसूर्य’ या दोन दर्जेदार ग्रंथांचे भव्य प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
या प्रकाशन सोहळ्यास ग्रंथालय संचालनालयाचे संचालक श्री अशोक गाडेकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोठेवार तसेच नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. दत्ता परदेशी प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या ग्रंथांचे लोकार्पण करण्यात आले.
सदर ग्रंथ कस्तुरी प्रकाशन, अमळनेर यांनी प्रकाशित केले असून, एस. के. प्रिंटिंग प्रेस, अमळनेर यांनी मुद्रण केले आहे. दोन्ही ग्रंथांमध्ये समाजजागृती, प्रेरणादायी विचार आणि सुस्पष्ट लेखनशैलीचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळतो.
कार्यक्रमात बोलताना संचालक श्री अशोक गाडेकर यांनी या ग्रंथांचे कौतुक करत, वाचकांनी या दर्जेदार साहित्याचा लाभ घेऊन आपली वाचनसंस्कृती अधिक समृद्ध करावी, असे आवाहन केले. तसेच डॉ. गजानन कोठेवार व डॉ. दत्ता परदेशी यांनीही या ग्रंथांतील विचारसंपदेचे कौतुक करत, लेखकाच्या लेखनशैलीचे विशेष अभिनंदन केले.
या कार्यक्रमास मुंबई विभागाचे सहाय्यक संचालक श्री प्रशांत पाटील, नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक श्री जोपुडे, श्री गोकुळ बागुल, सोनवणे सर, पारोळा नगरपरिषदेचे प्रथम नागरिक श्री चंद्रकांत पाटील, श्री समीर पाटील तसेच पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी लेखक सतीश पाटील यांनी उपस्थित मान्यवर, पाहुणे व वाचकप्रेमी यांचे आभार मानत, आपल्या लेखनातून समाजाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न कायम ठेवणार असल्याची भावना व्यक्त केली.

