प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड; कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ,  लॉगिनमध्ये बिले असूनही वेतन रोखल्याचा गंभीर आरोप,  श्री शिवाजी हायस्कूल प्रकरण तापले; ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा ८ दिवसांत पगार न दिल्यास तीव्र लढा
1 min read

प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड; कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, लॉगिनमध्ये बिले असूनही वेतन रोखल्याचा गंभीर आरोप, श्री शिवाजी हायस्कूल प्रकरण तापले; ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा ८ दिवसांत पगार न दिल्यास तीव्र लढा

Loading

प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड; कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

लॉगिनमध्ये बिले असूनही वेतन रोखल्याचा गंभीर आरोप

श्री शिवाजी हायस्कूल प्रकरण तापले; ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा
८ दिवसांत पगार न दिल्यास तीव्र लढा

अमळनेर प्रतिनिधी :
तांबेपपुरा येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील कर्मचाऱ्यांचे तब्बल सात महिन्यांपासून वेतन प्रलंबित ठेवण्यात आल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्नच निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या निष्क्रिय आणि उदासीन भूमिकेविरोधात युवा सेना आक्रमक झाली असून, येत्या ८ दिवसांत वेतन न दिल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात युवा सेनेच्या वतीने अमळनेर गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून त्याची प्रत जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनाही पाठवण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, श्री शिवाजी हायस्कूलमधील कर्मचारी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र, ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील वेतन अद्याप अदा करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, संबंधित बिले लॉगिनमध्ये उपलब्ध असतानाही कोणत्याही लेखी आदेशाशिवाय ती रोखून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

शिक्षकांवर उपासमारीची वेळ
वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे बँकेचे हप्ते थकले असून दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. “पिढी घडवणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणे ही प्रशासनासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे,” असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

८ दिवसांचा अल्टिमेटम
युवा सेनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सात महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पुढील ८ दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशारा तालुका प्रमुख राहुल भास्कर कंजर आणि शहर प्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *