नाशिक तपोवनात मुख्यमंत्री फडणवीस; संत-महंतांसह धार्मिक विषयांवर मंथन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची तयारी; तपोवनात मुख्यमंत्र्यांची घोषणा
![]()
नाशिक तपोवनात मुख्यमंत्री फडणवीस; संत-महंतांसह धार्मिक विषयांवर मंथन
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची तयारी; तपोवनात मुख्यमंत्र्यांची घोषणा
अमळनेर प्रतिनिधी :
नाशिक येथील तपोवन परिसरातील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व इतर मान्यवरांसह मनोभावे दर्शन घेतले व संतांचे आशीर्वाद प्राप्त केले. या भेटीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी पूज्य महाव्रत स्वामी (कोठारी संत), पूज्य दिव्यनयन स्वामी (संत निर्देशक), पूज्य यज्ञस्वरूप स्वामी तसेच पूज्य तीर्थस्वरूप स्वामी यांची विशेष उपस्थिती होती. संतांनी मुख्यमंत्री व मान्यवरांचे मंदिरात स्वागत करून त्यांचा सन्मान केला. यावेळी संत व मुख्यमंत्री यांच्यात आध्यात्मिक व सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा देखील झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसराची स्वच्छता, शिस्तबद्ध व्यवस्था आणि शांत वातावरण याचे विशेष कौतुक केले. “या ठिकाणी येताच मनाला विलक्षण शांतता लाभते,” असे ते म्हणाले. मंदिरातील आध्यात्मिक ऊर्जा आणि सुव्यवस्थित परिसर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
यानंतर अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय बैठकीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. देशभरातून आलेल्या संत, महंत व साधूंच्या उपस्थितीत धार्मिक व सामाजिक विषयांवर सखोल मंथन करण्यात आले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची व्यापक रूपरेषा तयार करण्यात आली आहे. भाविकांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि सुव्यवस्थित सुविधा मिळाव्यात यासाठी नियोजन करण्यात येत असून, साधू-महंतांचे मार्गदर्शन या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन, आमदार अँड. राहुल ढिकले, महापौर सौ. हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे तसेच देशभरातून आलेले संत, साधू व महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

