पुण्यात माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनची विशेष सभा; २१ एप्रिलच्या आंदोलनाचा निर्धार , पेन्शन, टीईटी व शिक्षक प्रश्नांवर सखोल चर्चा; राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित
![]()
पुण्यात माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनची विशेष सभा; २१ एप्रिलच्या आंदोलनाचा निर्धार
पेन्शन, टीईटी व शिक्षक प्रश्नांवर सखोल चर्चा; राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित
पुणे प्रतिनिधी, दि. २७ मार्च :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) कार्यकारिणीची विशेष सभा गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी पुणे विद्यार्थीगृहच्या महाराष्ट्र विद्यालयात उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर कानडे होते.
सभेच्या प्रारंभी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर फेडरेशनचे सचिव श्री. शालीग्राम भिरुड यांनी मागील सभेचे इतिवृत्त सादर केले, त्यास सर्व उपस्थितांनी एकमताने मंजुरी दिली.
यावेळी अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर कानडे यांनी दि. २१ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शिक्षक संघटनांच्या पूर्वीच्या संघर्षामुळेच आजचे हक्क प्राप्त झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत सुरक्षित व प्रभावी आंदोलनाच्या माध्यमातूनच प्रश्न सोडवावे लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पेन्शन विषयावर बोलताना त्यांनी S.O.P. ची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत असून ती वाढविण्याची मागणी केली. एप्रिल २०२४ पासून लागू झालेल्या रिव्हाईज पेन्शन योजनेतील संदिग्धता दूर करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
शिक्षक अभियोग्यता चाचणी (टीईटी) संदर्भात त्यांनी शासनाने शिक्षकांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून परीक्षेची कठीणता कमी करावी, तसेच सेवेतील शिक्षकांना अनुक्रमे ४५% व ५०% सवलत द्यावी, अशी मागणी केली.
सभेत धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी व सहसचिव संजय पवार यांनी जिल्हास्तरीय समन्वय समित्यांच्या नियमित बैठकीचे महत्त्व अधोरेखित केले. रत्नागिरीचे सागर पाटील यांनी दुर्गम भागातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकला.
या सभेस उपाध्यक्ष चांगदेव कडू, कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, एम. एस. लगड, प्रशांत भाऊसाहेब, राजेंद्र खेडकर, उद्धव गुंड, सुरेश वाघमारे, व्ही. टी. गवळे, संजय पाटील, रोहित जाधव, सचिन निरगल, मधुकर जाधव, सुनिल तायडे यांसह राज्यभरातील पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन सचिव शालीग्राम भिरुड यांनी केले तर आभारप्रदर्शन लगड सर यांनी मानले.
दरम्यान, याच सभेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर कानडे यांचा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.

