नगरदेवळ्यात रामनवमी पूर्वसंध्येला भजन संध्येत भक्तिरसाचा जल्लोष
![]()
संगीतमय भजन संध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद
नगरदेवळा : अयोध्यापती रघुकुलतिलक प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सव (रामनवमी) पूर्वसंध्येला नगरदेवळा येथील राम मंदिर चौकात आयोजित भव्य संगीतमय भजन संध्या भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून “श्रीराम जय राम जय जय राम” या गजरात सहभागी होत आध्यात्मिक आनंद अनुभवला.
या भजन संध्येत रामराज्य भजनी मंडळ तसेच शिवराणा भजनी मंडळ यांनी सुमधुर भजन-कीर्तन सादर करत संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून टाकला. श्रीरामांच्या विविध भक्तिगीतांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. पारंपरिक कीर्तन शैलीतून सादर करण्यात आलेल्या रचनांनी जुन्या भक्तिपरंपरेचा सुगंध दरवळत ठेवत नव्या पिढीलाही त्या भावविश्वाशी जोडण्याचे काम केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रभू श्रीरामांच्या आरतीने मंगलमय समारोप करण्यात आला. सर्व भाविकांनी एकत्र येत आरतीत सहभाग घेत भक्तीभावाने प्रभूंचे स्मरण केले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती अभिलाषा भिला रोकडे यांच्या शिवकन्या बहुउद्देशीय संस्था व महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या उपक्रमामुळे गावात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

