पुस्तकांची गुढी, वाचनाचा संकल्प’,  ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘पुस्तकांची गुढी’ उभारून वाचन संस्कृती जपण्याचा संकल्प
1 min read

पुस्तकांची गुढी, वाचनाचा संकल्प’, ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘पुस्तकांची गुढी’ उभारून वाचन संस्कृती जपण्याचा संकल्प

Loading

‘पुस्तकांची गुढी, वाचनाचा संकल्प’

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘पुस्तकांची गुढी’ उभारून वाचन संस्कृती जपण्याचा संकल्प

जळगाव: भारतीय संस्कृतीतील नववर्षाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून स्थानिक ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘वाचनाचा संकल्प, पुस्तकांची गुढी’ हा अभिनव उपक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपारिक गुढीला ज्ञानाची जोड देत, विविध विषयांवरील पुस्तकांची गुढी उभारून त्यांचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यात संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते.ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा लोहार यांनी आपल्या प्रास्ताविकातून पुस्तकांचे महत्त्व विशद केले.
केतन पाटील व मनाली पाटील या विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत मांडले. “पुस्तके ही केवळ कागदाचे तुकडे नसून ती विचारांचे भांडार आहेत; ती आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात,” असे विचार केतनने व्यक्त केले, तर मनालीने “मोबाईलच्या युगातही पुस्तकांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही,” असे सांगत वाचनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
रत्नमाला शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमासाठी कलाशिक्षिका भक्ती बर्वे व शिक्षिका मिनाक्षी इसे यांनी पुस्तके आणि व त्यांच्या लेखकांच्या नावांच्या रंगीत माळा तयार करून अतिशय कलात्मक सजावट केली होती. सर्व शिक्षकवृंदांनी मिळून ही ज्ञानाची गुढी उभारली. ग्रंथपाल रोशनी कोळी यांनी पुस्तकांची योग्य निवड करण्यात मदत केली.
मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. केवळ सण साजरा न करता त्यातून ज्ञानाची उपासना व्हावी, हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आगळ्यावेगळ्या ‘पुस्तकांच्या गुढी’मुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची नवी ऊर्मी निर्माण झाली असून, विद्यालयाने राबवलेल्या या संस्कारक्षम उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *