जमिनीशी नाळ जपणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व – पंडित (नानासाहेब) चौधरी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
![]()
जमिनीशी नाळ जपणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व – पंडित (नानासाहेब) चौधरी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील सामाजिक, राजकीय व पत्रकारितेच्या क्षेत्रात साधेपणा, प्रामाणिकपणा आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे वेगळी ओळख निर्माण करणारे पंडित (नानासाहेब) चौधरी हे नाव आदराने घेतले जाते. अत्यंत मितभाषी, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ओळखले जाणारे नानासाहेब अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही सदैव जमिनीवर पाय घट्ट ठेवून समाजसेवा करत राहिले.
नानासाहेब चौधरी यांचा जन्म ८ मार्च १९५३ रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. बालपणापासूनच कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजाशी जिव्हाळा ही मूल्ये त्यांनी आत्मसात केली. कुटुंबात शिक्षणाची परंपरा रुजवत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचे बाळकडू दिले. त्यांचे सुपुत्र युवा सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी सध्या नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून कार्यरत असून कुटुंबाची सामाजिक परंपरा पुढे नेत आहेत.
१९९० साली केरोसीन विक्रेता संघाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी स्वीकारली. तब्बल २७ वर्षे म्हणजे २०१७ पर्यंत त्यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि इमानेइतबारे सांभाळली. व्यापारी संघटनेच्या माध्यमातून अनेक विक्रेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
राजकारणातही त्यांनी सक्रिय भूमिका निभावली. ऑगस्ट १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शहराध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख ते जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. समाजकार्यातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन खानदेश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षपदावरही त्यांची निवड झाली.
तथापि, २०१६ मध्ये त्यांच्या पत्नींची निवडणूक विरोधी गटातून निवडून आल्यानंतर त्यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा व पक्षाचा राजीनामा देत राजकारणातील प्रामाणिकतेचे वेगळे उदाहरण घालून दिले. त्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही.
२०१७ ते २०२३ या कालावधीत अर्बन बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले असून २०२५-२६ या वर्षातही विद्यमान संचालक म्हणून सेवा बजावत आहेत.
राजकारणासोबतच पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. दैनिक नवाकाळ, दैनिक तरुण भारत आणि दैनिक जनशक्ती या वृत्तपत्रांत पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित घटकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडले. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला.
(जाहिरात)

पुढे स्वतंत्र विचारांना वाव देण्यासाठी त्यांनी ‘साप्ताहिक पार्टनर’ या वृत्तपत्राची स्थापना केली. या साप्ताहिकातून अमळनेर तालुक्यातील अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत लोकहिताच्या विषयांवर प्रभावीपणे लेखणी चालवली.
१९९७ मध्ये महाराष्ट्र शासनाने केरोसीन विक्रेता संघाच्या लायसनधारकांच्या वारसांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील विविध संघटनांना एकत्र आणून न्यायालयीन लढा उभारला. या संघर्षातून १९९९ साली संघटनेला न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला.
साधेपणा, प्रामाणिकता आणि तत्त्वनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. आयुष्यात अनेक पदे मिळाली, परंतु कधीही पदाचा गर्व न करता समाजाशी असलेली नाळ त्यांनी जपली. आजही कोणताही राजकीय आरोप नसलेले स्वच्छ आणि पारदर्शक जीवन त्यांनी जगले आहे.
२०१७ नंतर त्यांनी राजकीय व पत्रकारितेच्या क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारून शांत, समाधानी जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि नातवंडे असा प्रेमळ परिवार आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या आरोग्यदायी, आनंदी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
— शब्दांकन :
मा. तात्यासो कैलास नामदेव पाटील
नगरसेवक तथा सभापती (पाणीपुरवठा)
नगर परिषद, अमळनेर

