प्रताप महाविद्यालयातील गणित विभागाच्या शैक्षणिक सहलीद्वारे संख्यांपासून संस्कृतीपर्यंतचा प्रेरणादायी ज्ञानप्रवास*
1 min read

प्रताप महाविद्यालयातील गणित विभागाच्या शैक्षणिक सहलीद्वारे संख्यांपासून संस्कृतीपर्यंतचा प्रेरणादायी ज्ञानप्रवास*

Loading

*प्रताप महाविद्यालयातील गणित विभागाच्या शैक्षणिक सहलीद्वारे संख्यांपासून संस्कृतीपर्यंतचा प्रेरणादायी ज्ञानप्रवास*
—————————————–
अमळनेर: येथील प्रताप महाविद्यालयाच्या गणित विभागाची त्रिदिवसीय शैक्षणिक सहल दिनांक २४, २५ व २६ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. या सहलीद्वारे विद्यार्थ्यांना गणित विषयाचे संशोधनात्मक, ऐतिहासिक तसेच व्यावहारिक पैलू प्रत्यक्ष अनुभवण्याची मौल्यवान संधी मिळाली.
सहलीच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी The Maharaja Sayajirao University of Baroda येथील गणित विभागाला भेट दिली. विभागप्रमुख प्रोफेसर राजेंद्र व्यास व विभागातील सहकारी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गणितातील विविध संशोधन क्षेत्रांची सखोल माहिती दिली. उच्च शिक्षणाच्या संधी, संशोधनासाठी उपलब्ध असलेली क्षेत्रे तसेच भविष्यातील करिअरच्या दिशा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. एम.एस्सी. व पीएच.डी. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण करून गणिताच्या संकल्पनांचा दैनंदिन जीवनातील उपयोग कसा होतो, हे स्पष्ट केले. या संवादातून विद्यार्थ्यांना संशोधनाची प्रेरणा व नवी दिशा मिळाली.
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी Pavagadh Hill तसेच Champaner-Pavagadh Archaeological Park येथील पुरातत्त्वीय स्थळांना भेट दिली. येथील लेण्या, वास्तुकला व कलाकृतींचा अभ्यास करताना त्यामध्ये दडलेले भूमिती, प्रमाण, सममिती यांसारखे गणितीय घटक विद्यार्थ्यांनी अभ्यासले. प्राचीन स्थापत्यकलेत गणिताचा अचूक व प्रभावी वापर कसा केला गेला आहे, याचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी ‘संख्यांपासून संस्कृतीपर्यंत’ या संकल्पनेचा प्रत्यय घेतला.
तृतीय दिवशी विद्यार्थ्यांनी Statue of Unity येथे भेट देऊन जगातील सर्वात उंच पुतळ्याच्या निर्मितीमागील गणितीय व अभियांत्रिकी तत्त्वांची माहिती घेतली. इतक्या भव्य प्रतिमेचे संतुलन, रचना, उंचीचे प्रमाण, वाऱ्याचा वेग, वजनाचे वितरण या सर्व बाबींमध्ये गणिताचा कसा अत्यंत महत्त्वपूर्ण उपयोग झाला आहे, हे जाणून घेतले. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना गणित हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून दैनंदिन जीवन, स्थापत्यकला व विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यावश्यक आहे, याची जाणीव झाली. सदर सहल रुसा अंतर्गत प्रायोजित करण्यात आली होती व खर्चाच्या उपयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य एच.डी जाधव आणि आयक्यूएसी कॉर्डिनेटर डॉ मुकेश भोळे यांचे सहकार्य लाभले विभागातर्फे गणित विभागातर्फे सहल यशस्वी करण्यासाठी गणित विभाग प्रमुख प्रो. नलिनी पाटील व त्यांचे सहकारी सहकारी प्रो.रोहन गायकवाड , प्रा.प्रियका पाटील आणि प्रा.प्रेरणा सोनवणे आणि एस वाय बी एस सी व टी वाय बी एस सी मेजर गणित हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले
या त्रिदिवसीय शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन अधिक व्यापक झाला असून गणित विषयाबद्दलची आवड व संशोधनाची प्रेरणा वृद्धिंगत झाली आहे. अशा प्रकारे प्रताप महाविद्यालयातील गणित विभागाची ही शैक्षणिक सहल ‘संख्यांपासून संस्कृतीपर्यंत’चा प्रेरणादायी ज्ञानप्रवास ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *