टाकाऊ वस्तूंमधून त्रिमितीचा गोड धडा; साने गुरुजी विद्यालयात गणित झाले आनंददायी!
1 min read

टाकाऊ वस्तूंमधून त्रिमितीचा गोड धडा; साने गुरुजी विद्यालयात गणित झाले आनंददायी!

Loading

टाकाऊ वस्तूंमधून त्रिमितीचा गोड धडा; साने गुरुजी विद्यालयात गणित झाले आनंददायी!

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य तयार करून एक अभिनव व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. कृतीयुक्त व आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल आवड निर्माण करण्याचा हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला असून त्याची सकारात्मक अध्ययन निष्पत्तीही दिसून आली आहे.
सर्वसाधारणपणे त्रिमित (3D) आकृत्या आणि त्यावर आधारित उभे पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ व घनफळ यांसारख्या संकल्पना विद्यार्थ्यांना अवघड वाटतात. सूत्रांचे पाठांतर करताना गोंधळ निर्माण होतो आणि गणिताविषयी भीती निर्माण होते. ही अडचण लक्षात घेऊन विद्यालयातील गणित शिक्षक डी. ए. धनगर यांनी संस्था सचिव संदीप घोरपडे व मुख्याध्यापक सुनील चुडामण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव उपक्रमाची आखणी केली.
विद्यार्थ्यांना घरातील टाकाऊ वस्तूंपासून घन, इष्टिकाचिती (घनाभ) आणि दंडगोल यांसारखे त्रिमित आकार तयार करून आणण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध सर्जनशील मॉडेल्स तयार करून वर्गात सादर केले. या प्रत्यक्ष मॉडेल्सच्या साहाय्याने शिक्षकांनी त्रिमित आकृत्यांवरील सर्व संकल्पना सोप्या भाषेत व कृतीयुक्त पद्धतीने समजावून सांगितल्या.
यानंतर सहअध्यायी अध्यापनाचा भाग म्हणून दक्ष प्रकाश पाटील, नक्ष सचिन बोरसे, कौशल पंकज पाटील व अर्णव विवेकानंद पाटील या विद्यार्थ्यांनी इतर वर्गांमध्ये जाऊन या संकल्पना स्पष्ट केल्या. आपल्या मित्रांकडून शिकताना विद्यार्थ्यांमध्ये अधिक आत्मीयता व रुची निर्माण झाली. अवघड वाटणारी सूत्रे आता त्यांना सोपी व समजण्यास सुलभ वाटू लागली.
प्रत्यक्ष पाहून, हाताळून आणि स्वतः सूत्र तयार करण्याची पद्धत समजल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला. “गणित येत नाही” ही कमीपणाची भावना नाहीशी झाली आणि “आपल्यालाही सूत्र तयार करता येते” हा आत्मविश्वास त्यांच्या मनात दृढ झाला. पाठांतराची गरज न पडता सूत्रांची मुळ संकल्पना समजल्याने ती दीर्घकाळ लक्षात राहणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
श्री. धनगर यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे संस्था अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुनील पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृतीयुक्त व आनंददायी शिक्षणाची ही दिशा प्रेरणादायी ठरत असून, साने गुरुजी विद्यालयाने गणित विषयाला खऱ्या अर्थाने जीवन्त स्पर्श दिल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *