डॉ. नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्र मंडळ लंडनला भेट
![]()
डॉ. नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्र मंडळ लंडनला भेट
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या लंडन दौऱ्यादरम्यान दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र मंडळ लंडन येथे भेट दिली.
महाराष्ट्र मंडळ लंडन ही युनायटेड किंगडममधील मराठी समाजाचे प्रतिनिधित्व करणारी अत्यंत प्रतिष्ठित व जुनी संस्था असून, गेली सुमारे ९४ वर्षे ही संस्था मराठी संस्कृतीचे जतन, सामाजिक कार्यांना चालना देणे तसेच यूकेमधील मराठी समाजाला एकत्र बांधण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
डॉ. गोऱ्हे यांचे महाराष्ट्र मंडळ लंडन येथे मंडळाचे अध्यक्ष श्री. वृषाल खांडके, विश्वस्त श्री. वैभव खांडगे व डॉ. गोविंद कणेगावकर, उपाध्यक्ष श्री. अनिल कुलकर्णी, खजिनदार सौ. रेणुका फडके तसेच ज्येष्ठ नागरिक व मंडळाचे सदस्य यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरुवात नुकतेच दिवंगत झालेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
यानंतर मंडळाच्या काही सदस्यांनी गेल्या काही वर्षांतील सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. विशेषतः डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या २०२३ मधील महाराष्ट्र मंडळ लंडन भेटीनंतर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. तसेच यूकेमधील मराठी समाजाच्या विविध उपक्रमांबाबत व त्यांच्या योगदानाबाबत डॉ. गोऱ्हे यांना माहिती देण्यात आली. गेल्या एका वर्षातील मंडळाच्या कार्याचा संक्षिप्त आढावा सादरीकरणाद्वारे मांडण्यात आला.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत मंडळाच्या भविष्यातील कार्याबाबत अपेक्षा आणि दिशा स्पष्ट केली. त्यांनी महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ९४ वर्षांच्या वाटचालीतील कार्य, प्रगती आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
या बैठकीत महिलांच्या कल्याण, प्रगती आणि आरोग्यविषयक उपक्रमांसाठी दर दोन महिन्यांनी होणाऱ्या ऑनलाइन बैठकींमध्ये महाराष्ट्र मंडळ लंडनचे प्रतिनिधित्व असावे, असा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावास मंडळाने मान्यता दिली असून, मंडळातील दोन महिला सदस्य या उपक्रमासाठी प्रतिनिधी म्हणून कार्य करतील, असे निश्चित करण्यात आले.

