तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर…  “तळई भूषण” पुरस्काराने अण्णासाहेबांचा गौरव…
1 min read

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर… “तळई भूषण” पुरस्काराने अण्णासाहेबांचा गौरव…

Loading

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर…

“तळई भूषण” पुरस्काराने अण्णासाहेबांचा गौरव…

एरंडोल / धरणगांव प्रतिनिधी — पी डी पाटील सर

एरंडोल — तालुक्यातील तळई गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिव आर्मी ग्रुप, तळई यांच्या वतीने आयोजित भव्य शिवजन्मोत्सव सोहळा – २०२६ अत्यंत दिमाखात, उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात संपन्न झाला यावेळो संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
कार्यक्रमाची सुरुवात तळई माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या शिवगीतावरील नृत्याने झाली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या मनात शिवभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज व बहुजन महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला.
शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील सर यांनी प्रास्ताविकातून शिवविचारांचे महत्त्व अधोरेखित करत कार्यक्रमाची प्रभावी भूमिका उपस्थित श्रोत्यांसमोर मांडली. पुणे येथून विशेष करून आलेल्या शिवव्याख्यात्या शिवकन्या नमिता पाटील यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे तरुण” या विषयावर ओजस्वी, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विविध ऐतिहासिक दाखले व सद्याची वर्तमान स्थिती याची व्यवस्थितपणे सांगड घालून नमिता ताईंनी मांडणी केली. त्यांच्या प्रभावी वाणीने तरुण पिढीसमोर स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा वैचारिक दीप प्रज्वलित झाला.
कार्यक्रमप्रसंगी शालेय स्तरावर शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक भेट स्वरूप देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालत गावसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २२ कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा “तळईरत्न शिवसन्मान पुरस्काराने” मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सोहळ्याचा अत्युच्च क्षण म्हणजे खानदेशातील पहिले सत्यशोधक कीर्तनकार, माजी पंचायत समिती सभापती एरंडोल, प्रख्यात ॲडव्होकेट आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हभप आनंदराव नामदेवराव पाटील यांना “तळई भूषण” या मानाच्या व प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिव आर्मी ग्रुपचे संस्थापक यशवंतराव पाटील, वैचारिक स्वराज्य संस्थेचे संस्थापक दिनेश महाराज पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात अण्णासाहेबांनी मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत युवकांच्या संघटित कार्याचे विशेष कौतुक केले. अल्पवयात गावासाठी झटणाऱ्या आयोजकांच्या जिद्दीचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आभार व्यक्त करतांना हभप दिनेश महाराज पाटील यांनी मनोगतात ठाम भूमिका मांडली की, “माणसाचे वय मोठे असण्यापेक्षा मन मोठे असणे आवश्यक आहे. पुरस्कार देण्यासाठी केस पांढरे असावे लागत नाहीत; मन स्वच्छ आणि पांढरे असावे लागते.” त्यांच्या या विचारपूर्ण विधानाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रकाश तामस्वरे सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक यशवंत खुशाल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानने झाला, हा सोहळा तळई नगरीच्या सांस्कृतिक, वैचारिक आणि सामाजिक ऐक्याचा भव्य अविष्कार ठरला. शिवजयंतीच्या या अतिशय देखण्या कार्यक्रमाला गावातील महिला – पुरुष – अबालवृद्ध – युवक मंडळींची लक्षणीय उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *