कॉपीमुक्त बोर्ड परीक्षांसाठी अमळनेर PTA चे प्रशासनाला निवेदन , गुणफुगवट्याला आळा घालण्याची मागणी; प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कठोर उपाययोजनांची अपेक्षा
![]()
कॉपीमुक्त बोर्ड परीक्षांसाठी अमळनेर PTA चे प्रशासनाला निवेदन
गुणफुगवट्याला आळा घालण्याची मागणी; प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कठोर उपाययोजनांची अपेक्षा
अमळनेर (प्रतिनिधी) – दहावी व बारावी बोर्ड परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात याव्यात, यासाठी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (PTA) तर्फे सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन गट शिक्षणाधिकारी तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अमळनेर यांना देण्यात आले. यावेळी PTA संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, स्वर्णदीप राजपूत, सुधीर टाकणे, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात मागील काही वर्षांतील बोर्ड परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपीचे प्रकार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारांमुळे गुणफुगवटा होऊन प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. परीक्षा हॉलमध्ये जर कॉपीमुक्त वातावरण नसेल, तर मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होतो, अशी खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
PTA संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून, परीक्षेची पारदर्शकता व गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर दक्षता घ्यावी, उडत्या पथकांची प्रभावी नियुक्ती करावी तसेच मुक्त कॉपीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित राहावे आणि परीक्षांमध्ये प्रामाणिकतेची परंपरा दृढ व्हावी, हीच संघटनेची भूमिका असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

