भारतीय पुरातत्व विभागाचे जनक व लुप्त झालेली बौद्ध स्थळं नव्याने जगासमोर आणणारे सर कनिंग हॅम
![]()
भारतीय पुरातत्व विभागाचे जनक व लुप्त झालेली बौद्ध स्थळं नव्याने जगासमोर आणणारे सर कनिंग हॅम
____________________________________________
भारतात लेणी , विहार , स्तूप , चैत्य , मूर्ती निर्माण करून स्थापत्य , शिल्प , चित्र कला विकसित करण्याचे काम भारतातील सम्राट अशोक व बऱ्याच राजे लोकांनी केले मात्र कालानुरूप या वास्तू जमिनीत गडप झाल्या वा जनतेच्या नजरे पल्ल्याड गेल्या . भारतीय जनतेने या ऐतिहासिक वास्तूकडं कमालीचे दुर्लक्ष तर केलेच केले पण त्याचे जतन न करता त्याचे विद्रुपीकरण करून अनेक शिल्पं नष्ट केली . अनेक अवशेष जमिनीवर तशीच पडून राहिली . काही लोकांनी त्यांच्या घराच्या बांधकामासाठी या पुरातत्वीय विटांचा सर्रास वापर केला .
१८ व्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट असताना काही ब्रिटिश लेखकांनी आपल्या साहित्यातून या पुरातत्वीय बाबी मांडल्या . त्यांच्या लेखनातून काही अभ्यासक , संशोधक या विषयाकडे वळले व यावर आपले काम करू लागले . असे होत असतानाच ब्रिटिश अधिकारी असलेले सर कनींग हॅम यांनी सुद्धा काम सुरू केले मात्र हे काम व्यक्तिगत पातळीवर होणारे नसून संस्थात्मक पातळीवर व्हायला पाहिजे या करिता त्यांनी प्रयत्न केले. हे प्रयत्न करीत असतानाच त्यांनी १८३४ ला सारनाथ येथे उत्खनन केले . त्यांना तिथं अनेक बौद्ध अवशेष मिळून आले आणि जगभरातील या विषयाच्या अभ्यासकांना नवी दिशाच मिळाली . सारनाथ येथील उत्खनन हे भारतातील पहिले उत्खनन ठरले .
त्यांनी ह्यू यान स्यांग व अन्य पर्यटकांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथांच्या आधारे अनेक स्थळांचे निरीक्षण करून स्थान निश्चिती केली . अनेक ठिकाणी काही काही प्रमाणात उत्खनन केले व याकामी सरकारने पुढाकार घेऊन संस्थात्मक पातळीवर काम करावे या करिता प्रयत्नही केले . १८६० मध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारला या बाबत कठोर शब्दात पत्र पाठवून तुम्ही गेल्या १०० वर्षात या संदर्भाने कोणतेही ठोस कार्य केलेले नाही मात्र हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने या करिता स्वतंत्र खाते तयार करण्यात यावे अशी मागणी केली . त्यांच्या या पत्राची ब्रिटिश सरकारने दखल घेऊन १ डिसेंबर १८६१ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग असे स्वतंत्र कार्यालय सुरू केले व त्यांच्या महाव्यवस्थापक पदी सर कनिंग हॅम यांची नियुक्ती केली .
सर कनिंग हॅम यांनी पदभार स्वीकारला व लागलीच प्रत्यक्ष कामाला सूरावात केली . बुद्ध गया येथील २४ अवशेष त्यांनी शोधून काढले . भारतातील पहिली लेणी म्हणून जीची ओळख आहे त्या बाराबरा लेणीला नव्याने जगासमोर आणले . १८६५ पर्यंत त्यांनी फतेहगड , कनौज , कलसी, रुरकी , मथुरा ई. जागांचे सर्वेक्षण केले . याच बरोबर जमालगडी, युसुफझाई , तक्षशिला , सरहिंद व अन्य जागी असलेली ऐतिहासिक स्थळांची सखोल माहिती संकलित केली .
सर कनिंग हॅम यांच्या अथक प्रयत्नातूनच भारतातील बौद्ध धर्माचे जे लाखो अवशेष जमिनीखाली गाडली गेली होती ती नव्याने जमिनीवर आली, देश विदेशातील वास्तू संग्रहालयात संरक्षित ठेवली गेली , अनेक बौद्ध स्थळांचा पूर्णतः कायापालट झाला व जगासमोर भारत एकेकाळी बौध्दमय भारत होता हे सिद्ध करता आले. १८३४ पासून भारतात सुरू झालेले उत्खनन व त्यातून मिळत गेलेले बुद्ध अवशेष , बौद्ध स्थळं , शिल्प , स्तूप वगैरे बाबी आज जगाला ललामभूत ठरत आहेत. पुरातत्व विभागा तर्फे सुरू असलेले उत्खनन १४४ वर्षे झाली तरी पूर्ण होऊ शकत नाही यावरून या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे हे आपणास दिसून येते . भारताला पुरातत्व वस्तूंच्या माध्यमातून नवी दृष्टी देणाऱ्या कनिंग हॅम यांची आज १९१ वी जयंती त्या निमित्त त्यांना त्रिवार अभिवादन .
जयसिंग वाघ ……अजिंठा हाउसिंग सोसायटी
अजिंठा रोड , जळगाव . संपर्क. ९८८१९२८८८१

