ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात देशभक्ती आणि आरोग्याचा जागर; ‘वंदे मातरम्’ व ‘सूर्यनमस्कार’ स्पर्धा उत्साहात
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात देशभक्ती आणि आरोग्याचा जागर; ‘वंदे मातरम्’ व ‘सूर्यनमस्कार’ स्पर्धा उत्साहात
जळगाव : दि. २३/०१/२०२६ येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मातृ मंदिर विश्वस्त संस्था, निगडी (पुणे) यांच्या वतीने वंदे मातरम् समूहगीत गायन आणि सूर्यनमस्कार स्पर्धांचे अत्यंत उत्साही व भारावलेल्या वातावरणात आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून शाळेच्या प्रांगणात एकाच वेळी राष्ट्रभक्तीचा स्वर आणि आरोग्याचा जागर अनुभवण्यास मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे या होत्या, तर पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून मातृ मंदिर विश्वस्त संस्थेचे पदाधिकारी श्री. ज्ञानेश्वर सावंत व श्री. नरेंद्र भावे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनामध्ये पाहुण्यांनी ‘वंदे मातरम्’ आणि ‘सूर्यनमस्कार’ या दोन्ही विषयांचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. वंदे मातरम् हे केवळ गीत नसून तो भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा जिवंत हुंकार आहे आणि या गीतानेच देशात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवले, असे सांगतानाच त्यांनी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक सुदृढता कशी प्राप्त करता येते, यावर प्रकाश टाकला. सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम असून त्यातून विद्यार्थ्यांची एकाग्रता, आत्मविश्वास आणि आरोग्य वृद्धिंगत होते, सुदृढ शरीर आणि प्रखर राष्ट्रभक्ती हाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा खरा पाया आहे, असे मौलिक विचार पाहुण्यांनी आपल्या भाषणातून मांडले.
अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी पाहुण्यांचे आभार मानले व भविष्यातही अशा प्रकारचे शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रम शाळेत नियमितपणे राबविले जातील, असा विश्वास व्यक्त केला.
वंदे मातरम् समूहगीत स्पर्धेसाठी श्री. प्रवीण महाजन व त्यांच्या संचाने विशेष परिश्रम घेतले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात प्रचंड आत्मविश्वास व देशभक्तीचा भाव दिसून आला. तर, सूर्यनमस्कार स्पर्धेचे नेटके व शिस्तबद्ध आयोजन श्री. विवेक मोरे व श्री. संदेश करलकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी अत्यंत लयबद्ध पद्धतीने सूर्यनमस्कारांची आवर्तने पूर्ण केली. श्री. निर्मल चतुर यांनी आपल्या कलात्मक फलक लेखनातून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री. डी. ए. पाटील, श्री. महेंद्र नेमाडे व श्री. पराग राणे यांनी अतिशय चोखपणे बजावले. श्री. चंद्रकांत कोळी यांनी आपल्या ओघवत्या आणि धारदार शैलीत सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सांघिक परिश्रमामुळे हा कार्यक्रम अतिशय देखणा व यशस्वी झाला. या उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून झांबरे विद्यालयाचे कौतुक होत आहे.

