राष्ट्रजागरणाचा दीप प्रज्वलित! धार गावात क्रांतिकारी शहीदांच्या वंशजांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न
![]()
राष्ट्रजागरणाचा दीप प्रज्वलित! धार गावात क्रांतिकारी शहीदांच्या वंशजांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी
(एच. आर.ए.) यांच्या वतीने राष्ट्रजागरण या संकल्पनेतून धार गावात देशभक्ती, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडविणारा भव्य क्रांतिकारी शहीद व संत परंपरेच्या वंशजांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
या विशेष कार्यक्रमात क्रांतिकारी शहीद परिवारांचे वंशज तसेच अध्यात्मिक परंपरेतील थोर व्यक्तिमत्त्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये महामंडलेश्वर १००८ परम आदर्श वेदाचार्य संत हंसादनंद तीर्थजी, महामंडलेश्वर देवश्वर तीर्थजी, तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ९ वे वंशज अशोक मोरे (देहूकर) यांचा गौरव करण्यात आला.
तसेच शहीद सुखदेव यांचे वंशज अशोकजी थापर, हुतात्मा राजगुरू यांचे वंशज प्रशांतजी राजगुरू, अमर शहीद चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमितजी आझाद व नेहा आझाद यांचा भावपूर्ण व अभिमानास्पद सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.
कार्यक्रमास धार गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच एच.आर.ए. संघटनेची संपूर्ण टीम उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.
यावेळी एच.आर.ए. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भागवताचार्य कमलेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते — शशिकांत पाटील, गिरीश पाटील, आनंद चव्हाण, कौशल चव्हाण, कुलदीप खोरे, संकेत मांडे, दर्शन लाड, सुमित जोशी, करण परदेशी, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या राष्ट्रजागरण कार्यक्रमातून शहिदांचे बलिदान, संतांची शिकवण आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे समाजात राष्ट्रभक्ती, संस्कार आणि एकतेची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
> एच.आर.ए. तर्फे राबविण्यात येणारे असे राष्ट्रजागरण उपक्रम पुढेही सातत्याने सुरू राहतील, असा विश्वास आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.

