धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे गौरव ▪️संवेदनशील व लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक; तहसीलदार सूर्यवंशी यांचा सन्मान
![]()
धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे गौरव
▪️संवेदनशील व लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक; तहसीलदार सूर्यवंशी यांचा सन्मान
धरणगाव प्रतिनिधी- पी डी पाटील सर
धरणगाव : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, गरजू व दिव्यांग बांधवांसाठी नेहमीच तत्परतेने कार्य करणारे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या लोकाभिमुख व संवेदनशील प्रशासनाबद्दल राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, धरणगाव यांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
तहसील कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या विविध शासकीय योजना, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना, दिव्यांग सहाय्य योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करताना तहसीलदार सूर्यवंशी यांनी नेहमीच फाईलपेक्षा माणूस महत्त्वाचा ही भूमिका जपली आहे. दवाखान्यासाठी आवश्यक असलेले पिवळे रेशन कार्ड एका तासात उपलब्ध करून देणे, गरजू नागरिकांचे अर्ज तत्काळ मार्गी लावणे, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी सुसंवाद साधणे, ही त्यांची काम करण्याची ठळक वैशिष्ट्ये असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, धरणगाव तालुक्यातील दिव्यांगांना रू. २५०० मासिक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. अनेक अडचणी व प्रशासकीय टप्पे पार करत त्यांनी हाती घेतलेले काम शेवटपर्यंत नेऊन पूर्णत्वास नेले. त्यामुळे आज अनेक दिव्यांग कुटुंबांना आर्थिक आधार मिळू शकला आहे. निराश, उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना आधार देणारे, ‘खऱ्या अर्थाने लोकसेवक’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या तहसीलदार सूर्यवंशी यांचा अपंग महासंघातर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी अपंग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, रवींद्र काबरे, जेष्ठ कार्यकर्ते प्रमोद सुतारे, रमेश चौधरी, रमेश सपकाळे, बाबूलाल पटेल, तसेच प्रताप कोळी, रामभाऊ, रवींद्र पाटील, महिलाध्यक्ष प्रतिभा पाटील, सुनंदा हेडा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी तहसीलदार सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, भविष्यातही अशीच लोकाभिमुख व संवेदनशील प्रशासनाची अपेक्षा व्यक्त केली.

