अवकाश संशोधनात भारताची झेप; जगात चौथ्या क्रमांकावर – विजयसिंग पवार
1 min read

अवकाश संशोधनात भारताची झेप; जगात चौथ्या क्रमांकावर – विजयसिंग पवार

Loading

 

अवकाश संशोधनात भारताची झेप; जगात चौथ्या क्रमांकावर – विजयसिंग पवार

अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर येथे आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी ‘अवकाश संशोधन’ या विषयावर पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय, अमळनेरचे संचालक श्री. विजयसिंग पवार यांनी विद्यार्थ्यांना सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सकाळी ११:१५ ते १२:३० या वेळेत सीसीएमसी हॉलमध्ये हे सत्र पार पडले.

यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले की, जग वेगाने बदलत असून विद्यार्थ्यांनी स्क्रीनिंग टाइमपेक्षा रिडींग टाइम वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. भारत, अमेरिका व रशिया या देशांच्या अवकाश संशोधनाची सविस्तर माहिती त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून दिली. पुढील ६० ते ७० वर्षांत जग कसे असेल याची आजच कल्पना करणे आवश्यक आहे, कारण तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पवार पुढे म्हणाले की, १९५७ मध्ये रशियाने ‘स्फुटनिक-१’ उपग्रह अवकाशात सोडून अवकाश संशोधनाची पायाभरणी केली. १२ एप्रिल १९६१ रोजी युरी गागरिन हा अवकाशात जाणारा पहिला मानव ठरला. अमेरिकेने अपोलो-१ ते अपोलो-१७ अशी एकूण १७ मोहिमा राबवल्या. भारताने मात्र १९६९ ते २०२५ या कालावधीत अवघ्या ५० वर्षांत संशोधनातील अंतर भरून काढत अभूतपूर्व प्रगती साधली आहे.

भारताच्या अवकाश संशोधनातील क्रांतीत डॉ. विक्रम साराभाई, होमी भाभा आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत हा दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरलेला जगातील पहिला देश असून SLV, ASLV, PSLV, GSLV, चंद्रयान-१, २, ३, सूर्ययान व आदित्ययान या मोहिमांमुळे भारत अवकाश संशोधनात जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात दुपारी १२:३० ते १:३० या वेळेत डॉ. विवेक बडगुजर यांनी सरळसेवा परीक्षा, संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप, अभ्यासक्रम, नोट्स काढण्याची पद्धत, काय वाचावे व काय टाळावे तसेच प्रश्नांची काठिण्य पातळी त्यांनी सविस्तर समजावून सांगितली. वेळेचे योग्य नियोजन केल्यास स्पर्धा परीक्षेत यश निश्चित मिळू शकते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या कार्यशाळेसाठी डॉ. अमित पाटील, डॉ. धिरज वैष्णव, डॉ. विजय तुंटे, ग्रंथपाल दीपक पाटील, डॉ. विवेक बडगुजर, डॉ. बालाजी कांबळे, डॉ. हर्ष नेतकर, प्रा. अमोल अहिरे, प्रा. हिमांशू गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
सीसीएमसी विभागातील दिलीप शिरसाठ, पराग रविंद्र पाटील, नंदूसिंग पाटील, विशाल अहिरे, अतुल धनगर, योगेश चिंचोरे, दितेश चिंचोरे, भूषण चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाचे सूत्रसंचालन प्रा. विजय साळुंखे यांनी केले तर ग्रंथपाल दीपक पाटील यांनी आभार मानले. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *