चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लारास कॉलेजचा भव्य क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. गीता फोगट आणि ‘आयर्न मॅन’ कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा अभूतपूर्व उत्साह.
![]()
चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लारास कॉलेजचा भव्य क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न.
गीता फोगट आणि ‘आयर्न मॅन’ कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा अभूतपूर्व उत्साह.
मुंबई (विशेष प्रतिनिधी – उदय नरे):
चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल, क्लारास कॉलेज ऑफ कॉमर्स आणि क्लारास कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा कुंभमेळ्यात केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर शिक्षक आणि पालकांनीही मैदानात उतरून आपल्या क्रीडा गुणांचे दिमाखदार प्रदर्शन केले.
पहिला दिवस: क्लारास कॉलेजचा जल्लोष
क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी क्लारास कॉलेज ऑफ कॉमर्स आणि क्लारास कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी मैदान गाजवले. या दिवसाचे खास आकर्षण म्हणजे डहाणूकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. विनय भोले आणि ‘मिस्टर इंडिया’ तसेच ‘मिस्टर आशिया’ किताब विजेते हर्मीत सिंग यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी खेळाडूंचे मनोबल वाढवले आणि मैदानावर एकच उत्साह संचारला.
दुसरा दिवस: गीता फोगट आणि कृष्ण प्रकाश यांची विशेष उपस्थिती
दुसऱ्या दिवशी चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर स्कूलच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारताची पहिली महिला कुस्तीपटू आणि कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती गीता फोगट, तसेच प्रसिद्ध आयपीएस अधिकारी आणि ‘आयर्न मॅन’ कृष्ण प्रकाश उपस्थित होते.
पालक आणि शिक्षकांचाही सक्रिय सहभाग:
या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच शाळेतील शिक्षक आणि उपस्थित कर्मचाऱ्यांच्याही क्रीडा स्पर्धा यावेळी रंगल्या. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने उपस्थित मान्यवर भारावून गेले. या सर्व स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांचे विचार:


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश म्हणाले की, “शरीर ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी आणि अमूल्य देणगी आहे. परमेश्वराने दिलेल्या या संपत्तीचे रक्षण आपण केलेच पाहिजे आणि शरीराची काळजी घेतच आयुष्यात पुढे जायला हवे.”
तर गीता फोगट यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “खेळ हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. सुदृढ शरीर आणि निरोगी मनासाठी प्रत्येकाने खेळलेच पाहिजे.”
उत्कृष्ट आयोजन आणि विश्वास
शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे शिक्षण महर्षी आणि शाळेचे प्राचार्य श्री. अजय कौल सर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते. अजय कौल सरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेतून भविष्यात देशाचे नाव उज्ज्वल करणारे अनेक खेळाडू तयार होतील, असा ठाम विश्वास उपस्थित सर्व प्रमुख वक्त्यांनी यावेळी व्यक्त केला.


