प्रभाग १६ मध्ये अपक्षांचा दबदबा,  महेश प्रभाकर देशमुख व निलिमा विश्वनाथ पाटील बहुमताने विजयी; मतदारांनी दाखवला विश्वास
1 min read

प्रभाग १६ मध्ये अपक्षांचा दबदबा, महेश प्रभाकर देशमुख व निलिमा विश्वनाथ पाटील बहुमताने विजयी; मतदारांनी दाखवला विश्वास

Loading

प्रभाग १६ मध्ये अपक्षांचा दबदबा

महेश प्रभाकर देशमुख व निलिमा विश्वनाथ पाटील बहुमताने विजयी; मतदारांनी दाखवला विश्वास

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)

अमळनेर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ (अ व ब) मधून महेश प्रभाकर देशमुख व निलिमा विश्वनाथ पाटील हे दोन्ही उमेदवार अपक्ष म्हणून बहुमताने निवडून आले असून मतदारांनी पक्षीय राजकारणापेक्षा कार्यकर्तृत्वाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रभाग १६ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ पाटील सातत्याने नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत. ही सेवा परंपरा नवीन नसून, त्यांच्या वडील कै. पितांबर तात्या पाटील यांनी समाजसेवेला वाहून घेतलेले जीवन जगले. त्यानंतर त्यांच्या मातोश्रींनी नगरसेविका म्हणून जबाबदारी सांभाळली आणि आता त्याच परंपरेत सूना निलिमा पाटील नगरसेविका म्हणून निवडून आल्या, ही बाब प्रभागासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
विशेष म्हणजे, रविभाऊ पाटील यांनी स्वतः उमेदवारी न करता महिलेला प्राधान्य देत पत्नीला उमेदवारी दिली. कोणत्याही पक्षाची अधिकृत उमेदवारी न घेता अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय प्रभागातील मित्रपरिवाराशी सविस्तर चर्चा करून घेण्यात आला. निलिमा पाटील यांच्या उमेदवारीनंतर महेश प्रभाकर देशमुख यांनाही सोबत घेतले गेले. महेश देशमुख यांचा मितभाषी, शांत स्वभाव, वडीलधाऱ्यांना मान देणारा आणि हितचिंतक वर्गात चांगली पकड असलेला व्यक्तिमत्त्वाचा ठसा मतदारांना भावला.
निवडणूक प्रचाराच्या काळात सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (रविभाऊ) पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली. प्रभागातील सुख-दुःखात सहभागी होणे, मतदारांशी थेट संवाद साधणे, तसेच कोणतेही काम तात्काळ मार्गी लावण्यासाठी नेहमी तत्पर राहणे, या गुणांमुळे प्रभाग १६ मध्ये रविभाऊ पाटील यांनाच मतदारांची पहिली पसंती राहिली, हेच या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले.
रविभाऊ पाटील, महेश देशमुख परिवार व मित्रपरिवाराच्या सहकार्याने होम-टू-होम प्रचार करण्यात आला. या थेट संपर्काचा सकारात्मक परिणाम होत दोन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.
विजयानंतर विजयी उमेदवार निलिमा रवींद्र पाटील व महेश प्रभाकर देशमुख, तसेच सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील यांची प्रभाग १६ मधील मित्रपरिवाराने वाजत-गाजत मिरवणूक काढून जल्लोषात विजय उत्सव साजरा केला. प्रभागातील महिलांनी विजयी उमेदवारांचे औक्षण करत त्यांचा सत्कार केला. यावेळी दोन्ही विजयी उमेदवारांनी मतदार बांधव, भगिनी, युवक व ज्येष्ठ नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
आज प्रभाग क्रमांक १६ हा रविभाऊ पाटील व महेश देशमुख यांच्यासाठी केवळ प्रभाग न राहता एक कुटुंबच बनला आहे, असे चित्र दिसून येते. या निवडणुकीत आमदार अनिल पाटील समर्थित उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला, तर मतदारांनी अपक्ष उमेदवारांवर विश्वास दाखवला.
एकंदरीत, प्रभाग १६ मध्ये अपक्ष उमेदवारांच्या विजयामुळे आनंद व उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात रस्ते, ओपन प्लेस सुशोभीकरण, गटारी तसेच इतर नागरी समस्या मार्गी लावल्या जातील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *