व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न , तीन दिवस रंगला क्रीडांगणावरील जल्लोष, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे भव्य प्रदर्शन
1 min read

व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न , तीन दिवस रंगला क्रीडांगणावरील जल्लोष, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे भव्य प्रदर्शन

Loading

व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

तीन दिवस रंगला क्रीडांगणावरील जल्लोष, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे भव्य प्रदर्शन

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव २०२५–२६ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेच्या प्रशस्त मैदानावर दिनांक १०, ११ व १२ डिसेंबर २०२५ असे सलग तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन मा. श्री. उत्कर्ष पवार, सचिव मा. सौ. अलका पवार तसेच उपाध्यक्ष मा. श्री. उमाकांत पाटील यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी मुख्याध्यापिका वर्षा सोहिते यांनी प्रास्ताविकातून शाळेतील क्रीडा क्षेत्रातील वाटचाल व यशस्वी उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला.
मार्गदर्शन करताना चेअरमन मा. उत्कर्ष पवार यांनी शालेय जीवनातील आठवणी सांगत विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत मैदानावर विविध खेळ खेळण्याचे व निरोगी जीवन जगण्याचे महत्त्व पटवून दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत मिरवणूक काढत क्रीडा महोत्सवाची औपचारिक सुरुवात केली.
पूर्व-प्राथमिक विभागासाठी पॅकिंग बॅग्स, फ्रॉग जंप, बुक बॅलन्सिंग, रनिंग रेस असे मनोरंजक खेळ घेण्यात आले. तर प्राथमिक विभागासाठी सॅक रेस, स्पायडर रेस, १००/३०० मीटर धावणे, बॉटल रेस, लेमन अँड स्पून, थ्री लेग्स रेस, कबड्डी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे दर्शन घडवले.
दि. १३ डिसेंबर २०२५ (शनिवार) रोजी पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभाने या क्रीडा महोत्सवाचा यशस्वी समारोप झाला. बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हवालदार दीपकसिंग पपोला व सुभेदार धीरेंद्र प्रतापसिंग (४९ एम.एच. बटालियन एनसीसी, अमळनेर) यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान केली व सर्व स्पर्धकांचे कौतुक करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या स्पर्धांमध्ये Yellow House ने सर्वोत्तम प्राविण्य चषक पटकावला, तर Red House ला उपविजेतेपद मिळाले. सर्व क्रीडा स्पर्धांचे निरीक्षण क्रीडा शिक्षिका प्रतीक्षा पाटील, रोशनी महाजन, नीतू शेलकर व जयश्री परदेशी यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगिता फाळके व नीतू शेलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनीषा सोनार यांनी मानले. या यशस्वी आयोजनासाठी कविता पाटील, प्रियंका महाले, संगीता पाटील, मनीषा ठाकूर, चारुलता तायडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी भाग्यश्री पाटील व सविता चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना व क्रीडास्पर्धेची सकारात्मक वृत्ती विकसित होण्यास निश्चितच चालना मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *