विद्यार्थी झाले गुरू… महात्मा फुले स्मृतीदिनाने देवगाव–देवळी स्कूलमध्ये उजळली २५ वर्षांची अनोखी परंपरा!
1 min read

विद्यार्थी झाले गुरू… महात्मा फुले स्मृतीदिनाने देवगाव–देवळी स्कूलमध्ये उजळली २५ वर्षांची अनोखी परंपरा!

Loading

विद्यार्थी झाले शिक्षक… महात्मा फुले स्मृतीदिनाने देवगाव-देवळी हायस्कूलमध्ये  साकारली अनोखी परंपरा!

अमळनेर प्रतिनिधी –
सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य झिजवणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत देवगाव-देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलने एक अनोखी व प्रेरणादायी परंपरा पुढे चालवली—विद्यार्थ्यांकडून शिक्षक दिन साजरा! गेल्या पंचवीस वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष विलासराव शांताराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदर, जबाबदारी व नेतृत्वगुण रुजवतो आहे.
इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी या दिवशी मुख्याध्यापक, शिक्षक ते शिपाई अशा सर्व भूमिका अतिशय कौशल्याने साकारल्या. वैष्णवी भरत पाटील हिने मुख्याध्यापकाची जबाबदारी निभावली, तर गिरीजा माळी, नूतन पाटील, निशा जाधव, वैष्णवी पाटील, क्रिश पाटील, शिवम भील आणि वेदांत पाटील यांनी शिक्षकाच्या भूमिका साकारल्या. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भूमिका हिमांशू पाटील यांनी प्रामाणिकपणे निभावली. विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापनाची सूत्रे हातात घेऊन वर्गशिस्त, अध्यापनकौशल्य, संवाद आणि जबाबदारीचे मोल प्रत्यक्ष अनुभवले.
वर्गात शिस्त राखणे, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिकवलेले पोहोचवणे आणि गोंधळ हाताळणे किती अवघड असते, हे आज विद्यार्थी शिक्षकांनी प्रत्यक्ष जाणले. क्रिश, वेदांत, गिरीजा, शिवम यांनी अनुभव कथन करताना सांगितले की शिक्षकांचे संयम, मेहनत आणि जबाबदारी किती मोठी आहे हे आज समजले. विद्यार्थ्यांच्या या संपूर्ण उपक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख आय. आर. महाजन सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापिकेची भूमिका साकारणाऱ्या वैष्णवी पाटीलने आपल्या अध्यक्षीय भाषणात अतिशय परिपक्व विचार मांदले. तिने सांगितले की, शिक्षक शिकवत असताना विद्यार्थी गोंधळ करतात तेव्हा अध्यापन नीट होत नाही, परंतु आज तीच भूमिका निभावताना वर्गातील गोंधळ कसा त्रास देतो हे जाणवले. म्हणूनच वर्गात शिक्षक येताच शांत बसून लक्षपूर्वक ऐकण्याची प्रतिज्ञा तिने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने व्यक्त केली. वर्गशिक्षक आय. आर. महाजन सरांचे मार्गदर्शनाबद्दल तिने विशेष आभार मानले. महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचेही ती म्हणाली.
दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. प्रमुख पाहुणे म्हणून दहावीचे विद्यार्थी शिक्षक, व शाळेचे
मुख्याध्यापक अनिल महाजन, आय.आर. महाजन व एच.ओ. माळी सर उपस्थित होते. मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या कामाची प्रशंसा करताना म्हटले की महात्मा फुले स्मृतीदिन म्हणजे मूल्यांचा जागर असून विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त आणि जबाबदारी कौतुकास्पद आहे.
इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुतन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन गिरीजा माळी यांनी मानले. शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा फुले हायस्कूलमध्ये साजरा होणारा हा विद्यार्थी-शिक्षक दिवस केवळ एक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांना जबाबदारी, शिस्त, नेतृत्व आणि कृतज्ञतेचे मोल शिकवणारा जिवंत अनुभव आहे. महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सुजाण नागरिक घडवण्याची ही परंपरा निश्चितच आदर्श ठरत आहे.

क्षणचित्रे..
शिक्षकदिनाचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *