राष्ट्रभक्ती , मायभूमी बद्दल प्रेम व परिसराच्या ऋणानुबंधाचा परिसस्पर्श कवितेला अक्षर वाङ्मय बनवतो : हास्यसम्राट कवी अशोक काका नायगावकर* [ रोझोद्याच्या रसिकांना नायगावकरांच्या कवितांनी हसविले अन् जीवनमूल्यात्मक विचारांनी अंतर्मुखही केले ! ]
1 min read

राष्ट्रभक्ती , मायभूमी बद्दल प्रेम व परिसराच्या ऋणानुबंधाचा परिसस्पर्श कवितेला अक्षर वाङ्मय बनवतो : हास्यसम्राट कवी अशोक काका नायगावकर* [ रोझोद्याच्या रसिकांना नायगावकरांच्या कवितांनी हसविले अन् जीवनमूल्यात्मक विचारांनी अंतर्मुखही केले ! ]

Loading

*राष्ट्रभक्ती , मायभूमी बद्दल प्रेम व परिसराच्या ऋणानुबंधाचा परिसस्पर्श कवितेला अक्षर वाङ्मय बनवतो : हास्यसम्राट कवी अशोक काका नायगावकर*
[ रोझोद्याच्या रसिकांना नायगावकरांच्या कवितांनी हसविले अन् जीवनमूल्यात्मक विचारांनी अंतर्मुखही केले ! ]

” राष्ट्रभक्ती, मायभूमी बद्दल प्रेम व परिसराच्या ऋणानुबंधाचा परिसस्पर्श कवितेला अक्षरवाङ्मय बनवतो.’ काम हा मानवी जीवनाचा धर्म आहे. धर्म, काम, मोक्ष यात जर बिनसले तर संसारात अनंत अडचणी येतात. दहा मधले सहा विवाह आज संपुष्टात येत आहेत. परिणामी मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार घेणे अपरिहार्य होत आहे. आमच्या पूर्वजांनी कित्येक पिढ्या घटस्फोट घेतले नाहीत की जन्मदात्यांना वृद्धाश्रमात पाठवले नाही. याचा आताच्या पिढ्यांनी अंतर्मुख होऊन अभ्यास करून अनुकरण केले पाहिजे “असे मार्मिक प्रतिपादन महाराष्ट्राचे हास्य सम्राट ज्येष्ठ कवी अशोक काका नायगांवकर ( मुंबई ) यांनी केले. साहित्यिक पत्रकार राजेंद्र चौधरी यांच्या ” दिवा तुळशीरामाचा ” ( कवितासंग्रह ) व ” ज्ञानधारा ” ( लेखसंग्रह ) या साहित्यकृतींच्या प्रकाशन समारंभाच्या औचित्याने नियोजित कवी संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून नायगावकर मार्गदर्शन करतांना बोलत होते. कवी संमेलन दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी रोझोदा ( ता.रावेर ) येथील जागृत तीर्थक्षेत्र श्रीकामसिध्द मंदिर सभामंडपात पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या औचित्याने थाटामाटात संपन्न झाले. विचारपीठावर अखिल भारतीय संत समातीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जर्नादन हरीजी महाराज यांच्या हस्ते पुस्तके प्रकाशित करण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते तथा प्रबोधनकार व. पु. होले सर, दिनदलितांचे डॉक्टर अतुल सरोदे, नरेंद्र नारखेडे, डाँक्टर शशिकांत गाजरे. होते.
यावेळी सुप्रसिद्ध कवयित्री सौ.स्वाती शृंगारपुरे, संयोजक कवी राजेंद्र चौधरी सर , विजय लुल्हे , साहित्यिक तथा गीतकार अन् गायक आर. बी.सोनवणे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

” कधी तरी सोडू दे ना
हे मायेचे पाश
होऊ दे ना वारकरी
नको संसाराची आस “

स्वाती ताई शृंगारपुरे यांच्या या दमदार काव्यपंक्तींनी अध्यात्मिक वातावरण तयार केले.स्वातीताई यांनी ‘ विठ्ठला ‘ या आपल्या कवितेत संसाराच्या मोह मायेमध्ये विठुरायाची कधी आठवण केली नाही हे मान्य केले. आता विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या वारीची आस व तगमग कवितेतून मांडतांना वारीच्या मार्गक्रमणातून मिळणारी जीवनाभूती व महात्म्य सुगम भाषेत मांडले.
संयोजक कवी राजेंद्र चौधरी आपल्या ‘ बाप ‘ या कवितेतून म्हणतात ,

” बाप घराचा पाया असतो
तो सहज हार कधी मानत नसतो
परिवारावर संकट कितीही आले
वेदना कोणाला होऊ देत नसतो “

आईच्या तुलनेत बापाची कुटुंबाप्रती उपेक्षित त्याग, समर्पण व समायोजन मूल्यांची वैशिष्ट्ये सांगून श्रोत्यांची दाद मिळविली. बापाचं काळीज समजून घेणं सोपं नसतं ; काहींना बाप मेल्यावर कळतो ही तीव्र खंत चौधरी यांनी व्यक्त केली.
साहित्यिक तथा गीतकार आर.बी. सोनवणे यांनी ‘आधारवड ‘ कविता सादर केली.

” वडा ऊठ पुन्हा उभा रहा
आम्ही तुला साथ देऊ
पुन्हा लावू रोपटे आम्ही
उंच शिखराचा गड हो “

वृक्षतोडीतून पर्यावरणाचा झालेला ऱ्हास त्यांनी मांडला. बालगोपालांचे खेळांन्वये व सुवासिनी माता भगिनींचे सण परंपरांतर्गत वटवृक्षाशी असलेले अतूट नाते सांगितले. वृक्ष मानवजातीला संजीवनी देतात ; वृक्ष आधारवड आहेत. हा कालसापेक्ष चिरंतन संदेश त्यांनी कवितेतून देऊन दाद मिळवली.
कवी विजय लुल्हे यांनी ‘ डार्विनचं सांत्वन ‘ कविता सादर केली. कवितेत लुल्हे म्हणतात ,

” भागवत कथा वाचनासारखी
चौकाचौकात ऐकवतात शीलभ्रष्ट पोरं
शेजारी राहणाऱ्या ‘ सीते ‘ चा
कधीच ‘ न ‘ पाहिलेला बदफैलीपणा

लुल्हे पुढे म्हणतात,

” बलात्कार करून
जीवन उध्वस्त करणाऱ्या
भावनिक षंढानाच नव्हे तर
पुरुषी अहंकारांची बीजं जोपासणाऱ्या
तमाम पुरुषांनाच आता
आदिमानव बनवले पाहिजे नव्याने
तेव्हाच पुरुष जातीची
प्रगती होणार…….
तोवर मी डार्विनचं
सांत्वन करतो …….

मंदिरातला प्रसाद सार्वजनिक वाटणे या परंपरेनुसार सहजतेने अनैतिक कृत्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देऊन निष्पाप कुमारिकांची बदनामी आणि दिवसोंदिवस छळ अन् बलात्कार करून जीवन उद्ध्वस्त केले जात आहे.याचे भीषण चित्र मांडून उत्क्रांतीवादाची अभिनव मांडणी करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन करीत लुल्हे यांनी साहित्यिक व रसिकांना विचारप्रवृत्त करून अंतर्मनाला हात घातला. प्रस्तावना विजय महाजन व राजेंद्र चौधरी यांनी केली.
———————————–
*हास्य सम्राट अशोक नायगावकर*

” असो नसो नोकरी
तरी घर तुमचेच “….

” घ्या पदरात पडेल ते शेवटी कुंकू आहे ना अखेरीस “…

अशा सुगम भावसंपृक्त अप्रतिम काव्यपंक्तींनी श्रोता भगिनींच्या मनाचा ठाव काका नायगावकरांनी घेतला.

*माय आम्ही तुझ्या पोटी*
*एकदाच येतो*
*तू तर आमच्या पोटात*
*रोजच शिरते भाकरी होऊन*……

ही मायची महती सांगणारी कविता सादर करून नायगावकांनी पुरुषांच्या दगडी मनाला पाझर फोडला !

” बायांनो ,
घर लपेटून घेता तुम्ही
सहावारी , नऊवारी नेसून…
पदर फडकवतात झेंड्यासारखा
अशाच झुलत रहा,
आभाळ कंदीला सारख्या “…..

या कवितेतून संस्कृती जोपासत निर्भय व जबाबदार आधुनिक स्त्रीचे
चित्र दमदारपणे अशोक नायगावकरांनी जोशात सादर केले. माता भगिनींच्या मनाचा ताबा घेतल्यावर नकळत मार्मिक व्यवहारीक वागण्यातून स्रियांवर विनोदाचा बॉम्ब टाकत नायगावकर कवितेतून म्हणाले, ‘ सत्य सांगणे कवीचे कर्तव्य आहे म्हणून सांगतो. महिला अतिशय कोमल असतात हा भ्रम आहे मात्र पुरुष अत्यंत नाजूक व कोमल हृदयाचा असतो हे त्यांनी सोदाहरण साभिनय सांगून हास्यांचे कारंजे फुलविले आणि हास्यसम्राट असल्याने सिद्ध केले !
———————————–
ज्येष्ठ कवी डॉक्टर अतुल सरोदे यांनी दिवाळी सणाला समयोचित नर्मविनोदी ‘ फराय ‘ कविता सादर केली.

” नही खाल्लं त वांधा
खाल्ल तं पस्तावा
म्हणून दिवाईले
घरच्या घरी रांधा “

गृहिणींचे दिवाळी फराळाच्या वस्तू बनवितांना पाककलेतील व्यंग मिश्किलपणे अन् विशेषतः लेवा गणबोलीत तेही ठसकदार लेवा भाषेच्या लहेज्यात सादर करुन समस्त महिला भगिनींची उत्स्फूर्त दाद मिळवून हसून पुरेवाट लावली !
काव्य संमेलनाच्या उत्तरार्धात निमंत्रित कवींना ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ , सन्मानाचिन्हासह शाल देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तसेच विश्वस्त मंडळाच्या वतीने गुणवंत नारायण टोंगळे यांनी अशोककाका नायगांवकर यांचा सत्कार केला.
कवी संमेलनास कामसिध्द महाराजांचे परमभक्त डॉक्टर शशिकांत गाजरे ,श्रीराम मंदिर व कामसिध्द मंदिर विश्वस्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय महाजन, ह. भ. प. दुर्गादास महाराज व एकदंत महाराज ( उत्तराधिकारी सत्पंथ मंदिर , फैजपूर ),उद्योजीका दिपाली तळेले, उद्योजीका स्मिता संजय पाटील.उद्योजक तसेच कु-हा येथील सरपंच बी. सी. महाजन, संजय पाटील, कलाध्याक सुनील बोरोले सर, युवराज लोधी सर, लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश महाजन, प्राध्यापक गणेश पाटील, हवालदार मनोहर पाटील, सौ. स्वाधीनता चौधरी, हिरामण दादा चौधरी,आदर्श शिक्षक सोमनाथ पाटील सर , प्राध्यापक कैलास पाटील, अमृताई चौधरी, पत्रकार कमलाकर दादा माळी, छायाचित्रकार देवेंद्र चौधरी यांसह परिसरातील पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर साहित्य रसिक, आप्तेष्ट व मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक विजय महाजन व राजेंद्र चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द शिल्पकार नंदकुमार सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन संयोजक राजेंद्र चौधरी सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *