जनजातीचे उत्थान हेच स्मारकाचे उद्दिष्ट – प्रा. आर. एन. महाजन : धरणगाव हेरिटेज वाॅक गृपची खाजाजी नाईक स्मारकाला भेट :
![]()
जनजातीचे उत्थान हेच स्मारकाचे उद्दिष्ट – प्रा. आर. एन. महाजन :
धरणगाव हेरिटेज वाॅक गृपची खाजाजी नाईक स्मारकाला भेट :
धरणगाव प्रतिनिधी
स्मारकं समाजाचे दिशादर्शक व्हावेत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्रीद आहे. त्या अनुशंगाने जनजातीतील आदिवासी बांधवांना प्रेरणा देईल आणि त्यांचे उत्थान करेल असे कार्य क्रांतिकारक खाजाजी नाईक स्मारकाच्या माध्यमातून उभे राहील असे प्रतिपादन सामाजिक समरसता मंचचे प्रांतकार्यवाह प्रा. आर. एन. महाजन यांनी केले. ते धरणगाव हेरिटेज वाॅक गृप आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी. जी. पाटील होते.
सर्वप्रथम संयोजक प्रा.बी.एन.चौधरी यांनी हेरिटेज वाॅक गृपची संकल्पना आणि गृपच्या वाटचालीचा आढावा मांडला. धरणगाव आणि परिसरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांची माहिती समाजाला व्हावी हा या गृपचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. संयोजक जैनेंद्र जैन यांच्या हस्ते प्रा. आर. एन. महाजन, डॉ. मिलिंद डहाळे यांच्या हस्ते प्रा.बी.एन.चौधरी, डि. जी. पाटील यांच्या हस्ते वाय. डी. पाटील आणि विलास महाजन यांचा ग्रंथ, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर वाय. डी. पाटील आणि विलास महाजन यांनी स्मारकाची संपूर्ण माहिती दिली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तीन मजली टुमदार इमारतीत अत्याधुनिक, वातानुकूलीत बहुविध दालनं आहेत. यात भव्य स्वागत कक्ष, प्रशासनिक दालन, जनजाती क्रांती प्रदर्शनी, महर्षी वाल्मिक ग्रंथालय, संजय दृकश्राव्य सभागृह, ४५० विद्यार्थी असणारी आश्रमशाळा, देवमोगरा माता विद्यार्थी निवास आणि खाजाजी नाईक यांचे प्रेरणादायी स्मारक आहे. या ठिकाणी जनजाती संदर्भातील ग्रंथ, तांत्रिक संग्रह उपलब्ध असून संशोधक विद्यार्थी अभ्यास करु शकतील. या निमित्ताने शहरात सर्व सोयींनी युक्त विद्या केंद्र उभे राहिले आहे.
कार्यक्रमाला चिमनलाल जैन, विवेक लाड, कडू महाजन, मुकेश तिवारी, राहुल जैन, नितीन जैन, डॉ.मिलिंदजी डहाळे, डॉ.पद्मिनी डहाळे, अतुल डहाळे, अर्चना बन्नोरे, अंजली डहाळे, सखाराम एकनाथ माळी, सौरभ डहाळे, वाय.डी.पाटील, भुपेंद्र पाटील, आर. एन. पुरभे, मिठाराम सिताराम माळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल जैन यांनी तर आभार प्रदर्शन मुकेश तिवारी यांनी मानले.

