भाजपला रोखण्यासाठी समाजवादी अजेंडा आवश्यक – अखिलेश यादव
![]()
भाजपला रोखण्यासाठी समाजवादी अजेंडा आवश्यक – अखिलेश यादव
लखनऊ (विशेष प्रतिनिधी उदय नरे )
“समाजवादी अजेंड्याशिवाय भाजपला रोखता येणार नाही आणि सत्तेतून घालवता येणार नाही,” असे ठाम विधान समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले.लखनऊ येथील डॉ. राममनोहर लोहिया ट्रस्टच्या दालनात महाराष्ट्रातील समाजवादी कामगार नेते कपिल पाटील, सपा महाराष्ट्र अध्यक्ष अबू आसिम आझमी आणि ज्येष्ठ नेते राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत ते बोलत होते.
अखिलेश यादव देशभरातील विविध समाजवादी गटांशी संवाद साधत आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातील कामगार चळवळीतील योगदान, जॉर्ज फर्नांडिस यांच्या कामगार संघटना आणि नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीतील समाजवादी प्रेरणेचे त्यांनी कौतुक केले. महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या चळवळींनी देशाला नवी दिशा दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीदरम्यान अखिलेश यादव यांनी कपिल पाटील यांना सावित्रीबाई फुले यांची कांस्य मूर्ती भेट दिली. त्यांनी शिक्षक-कायम नियुक्ती चळवळीतील प्रयत्नांची आठवण करून देत यूपीमध्येही तोडगा काढण्यासाठी चर्चा झाल्याचे सांगितले. जागतिक समाजवादी विचारप्रवाहांवरही चर्चा झाली. Invisible Doctrine (George Monbiot, Peter Hutchison) आणि Time for Socialism (Thomas Piketty) या पुस्तकांचा उल्लेख करत अखिलेश यांनी महाराष्ट्र व गुजरातच्या साथीनं देशात सत्ताबदल शक्य असल्याचे नमूद केले.
चर्चेच्या दुसऱ्या भागात कपिल पाटील यांनी आरएसएसच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त करत समाजवादी एकजूट घडवण्याची गरज मांडली. अखिलेश यादव यांनी मधु लिमये आणि मुलायमसिंह यादव यांनी संघाचा धोका अचूक ओळखल्याचे सांगून त्यांचे योगदान अधोरेखित केले. ज्येष्ठ नेते राजेंद्र चौधरी यांनी साने गुरुजी व एस. एम. जोशी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या ऐतिहासिक भूमिकेची आठवण करून दिली आणि उत्तर भारतात सेवा दल बळकट करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
राष्ट्र सेवा दलाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांचे देशभर सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याबद्दलही या बैठकीत माहिती देण्यात आली. समाजवादी चळवळींची एकजूट आणि भाजपविरोधी पर्याय उभा करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज सर्वांनी मान्य केली.

