राजे संभाजी महाविद्यालयात इसार संस्थेमार्फत बालविवाहमुक्त हिंगोली जनजागृती कार्यक्रम”
![]()
“राजे संभाजी महाविद्यालयात इसार संस्थेमार्फत बालविवाहमुक्त हिंगोली जनजागृती कार्यक्रम”
हिंगोली : राजे संभाजी महाविद्यालय येथे इन्स्टिट्युट ऑफ सोशल अवेअरनेस & रिफॉर्म- इसार संस्था, यवतमाळ व बालकल्याण समिती, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६/०८/२०२५ रोजी बालविवाहमुक्त अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बालकल्याण समिती सदस्य श्री. पी. आर. हेंबाडे यांनी महाविद्यालयातील बालिकांना बालविवाहाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की मुलीच्या विवाहाचे वय 18 वर्षे व मुलाच्या विवाहाचे वय 21 वर्षे असून, या वयापूर्वी विवाह केल्यास संबंधित वर-वधू तसेच त्यांचे पालक यांच्यावर पीसीएमए ॲक्ट 2006 नुसार गुन्हा दाखल होतो.
बालविवाहामुळे मुलांचे शिक्षण थांबते, मुलींची शारीरिक व मानसिक वाढ अपुरी राहते, तसेच अल्पवयात मातृत्व आल्यास माता व बालकाच्या मृत्यूचा धोका वाढतो, असेही त्यांनी नमूद केले. पालकांचे अज्ञान, गरिबी, शिक्षणाविषयी अनास्था तसेच भौतिक व सामाजिक परिस्थिती ही बालविवाहाची मुख्य कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, बालकल्याण समिती सदस्य सौ. बाली भोसले यांनी पॉक्सो कायदा 2012 संदर्भात माहिती देत सांगितले की, 18 वर्षांखालील मुलीशी कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे, तिची संमती असो वा नसो. यामध्ये दोषींना 3 वर्षांपासून 20 वर्षांपर्यंतच्या शिक्षेचे प्रावधान आहे. लैंगिक अत्याचार किंवा बालविवाहाची माहिती असल्यास 1098 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्वरित पोलीस मदत मिळते तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते, असे त्यांनी सांगितले. मुलींना गुड टच व बॅड टच याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी इसार संस्थेच्या जिल्हा समन्वयक सौ. अनिता भगत यांनी इसार संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व सर्व विद्यार्थ्यांकडून तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून बालविवाहमुक्तीची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शेळके, मुख्याध्यापक सुधाकर बल्लाळ, प्रा. जाधव, प्रा. डोल्हारे, श्री. संदीप बोरकर तसेच महाविद्यालय व शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

