“संसारातल्या संघर्षाला गोडवा आणणारी – आईची पुरणपोळी”
![]()
“संसारातल्या संघर्षाला गोडवा आणणारी – आईची पुरणपोळी”
अमळनेर प्रतिनिधी
सण-पावन राहिला म्हणजे आई हमखास पुरणपोळी करायची.. तिच्या हाताला विशिष्ट चव होती.. घरात अठरा विश्व दारिद्र्य असलं, तरी सण आठ दिवसावर आहे या अगोदरच तिची मनात तयारी सुरू व्हायची.. त्या दिवशी लागणारं साहित्य हरभऱ्याची डाळ, गुळ इ. इ. पदार्थांची जमवा-जमव तिची सुरू असे.. लहानपणी आम्हा पोरांना ‘पोया यी ऱ्हाय ना..त्या दीन पुऱ्या, रसीभात कुदी-कादी खासुत..’ या प्रलोभनाने ती शेतात काम करण्यासाठी घेऊन जात असे.. त्यातून काही पैसे मिळाले म्हणजे काही दिवस संसाराचा गाडा चालायचा..आणि सण देखील साजरा होत असे..
शाळेला सुट्टी असली म्हणजे हमखास कोणाच्या तरी शेतात जाणं फिक्स राहायचं.. पावसाळ्याच्या दिवसात निंदणी आणि टूपनी असायची.. दिवाळीच्या सीजनमध्ये कापूस वेचणी, दादर पेरणी असायची.. जानेवारी,फेब्रुवारी महिन्यात दादरच्या कणसावरील चिमण्या (व्हर्या) उडवायचं काम असायचं.. उन्हाळ्याची चाहूल लागली म्हणजे वायवण कपाशीच्या वखरटी मागे काड्या वेचणं असायच..तुरीच्या खुंट्या…दादर, गहूची कापणी…त्यानंतर दादर, ज्वारीची धसकट वेचणी..भर उन्हाळ्यात तर लोखंडी नांगर व बळीराम नांगर शेतात चालवणे असायचे.. आणि काही नसलं म्हणजे सरपणासाठी शेणाच्या गोवऱ्या शेतात वेचायला जावं लागायचं…या माध्यमातून आई-वडिलांनी आमच्यावर श्रमसंस्कार केले.. शाळा असली म्हणजे शाळेत आणि शाळेला सुट्टी म्हणजे शेतात हा क्रम असायचाच.. यातून एखादा दिवस पाऊस पडून शेतातील कामाची वाफ गेली म्हणजे घरी राहायला मिळायचं.. शक्यतोवर श्रावणातली झडी लागायची त्यावेळेस घरी राहायला मिळायचं.. अन्यथा शेत आणि शाळा या दोन गोष्टीतून सुटका मिळणं दुरापास्तच होतं..
मला चांगलं आठवतं तिसरी-चौथी मध्ये असेल मी.. तेव्हापासून आई दुसऱ्याच्या शेतात मला कामासाठी घेऊन जायची..लहान होतो म्हणून चाच (एक ओळ) घ्यायचो.. शेतमालक आईला..एवढ्या लहान मुलाला का बरं घेऊन आली.. म्हणून नाना तर्हेने बोलायचे.. पण आई ते निमुटपणे सहन करायची.. कारण त्या निमित्ताने दोन पैसे मिळतील आणि आपल्या दरिद्री संसाराला मदत होईल..म्हणून ती सर्व सहन करत असे.. गरीबी माणसाला सहनशीलता शिकवते.. मला मात्र ओशाळल्यासारखं व्हायचं.. म्हणून मी जास्तीचं काम करण्याचा प्रयत्न करायचो.. परंतु वय लहान असल्यामुळे व्हायचं नाही.. मोठा झालो की मी ही सगळी गरिबी मिटवेल.. असं स्वतःशीच मी बोलत राहायचो..
काम करून सुद्धा रोख मजुरी लवकर मिळत नसायची.. शेतमालकाकडे खेटरा माराव्या लागत असत.. बऱ्याचदा वाद व्हायचे.. मग सणाच्या आदल्या दिवशी पैसे मिळायचे.. आई बापूंना सांगून बाजारहाट घरात आणायची.. आणि मग सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आई शीळ- वराट्यावर शिजवलेली हरभऱ्याची डाळ गुळ घालून वाटायची.. वाटून पुरण तयार व्हायचं..आणि मध्येच आम्ही ते पुरण चोरून गोड लागत म्हणून खायचो.. आई आम्हाला हटकायची, ‘पुऱ्या गोड होणार नाहीत!’ असं म्हणायची.. एकीकडे चुल्यावर रसई आणि भात लावलेला असायचा.. घरातलं वातावरण कसं प्रसन्न वाटायचं.. आणि विशेष म्हणजे आज घरी राहायला मिळतंय याचा विशेष आनंद व्हायचा.. गावातली सगळी पोरं, सगळे नातेवाईक मंडळी एकमेकांना भेटीगाठी घ्यायचे.. सारा गाव कसा आनंदी असायचा.. आणि सणाच्या दिवशी एक वेगळंच वातावरण असतं.. याची जाणीव व्हायची.. पुरण वाटून झाल्यावर थोड्या वेळात आई पुरणाच्या खापरा वरच्या खमंग पोळ्या टाकायला बसायची.. खापरभर खरपूस भाजलेली पोळी पाहून तोंडाला पाणी सुटे.. एक एक पोळी ती चार मस्त घड्या घालून टोपलीत रचायची.. पुरणपोळ्या झाल्यावर आई गरमागरम भज्या काढण्यासाठी खोलगट तव्यावर तेल टाकायची..तेल गरम झाल्यावर गरमागरम भज्या काढायची आणि बापूंना व आम्हा सर्वांना गरमा गरम भज्या खाण्यासाठी ताटाजवळच बसवायची.. एकेक घाण निघाला म्हणजे आम्ही सर्वजण त्या फस्त करायचो.. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर विशिष्ट आनंद दिसायचा.. आमच्या तृप्तीत तिचा आनंद असे..’मन भरी खाई ल्या..आपले कव्वय – मव्वय भेटस..’ असं म्हणून ती कुरडयांचा सुद्धा एक घाण काढायची.. मग पूजाअर्चा झाली म्हणजे पुन्हा जेवणाचे ताट करून सर्व कुटुंब एकत्र जेवणास बसायचो..’पुई नरम उनी ना..!’ असं आम्हाला ती विचारायची.. ‘खूप नरम आली!’ असं आम्ही म्हटल्यावर तिला खूप हायसं वाटायचं.. आणि आपली मेहनत फळाला आली म्हणून तिला आनंद व्हायचा.. जेवताना खूप सार्या सुखदुःखाच्या गप्पा व्हायच्या.. ‘मना दादाले,आप्पा ले पुऱ्या गयऱ्या आवडतीस..आणि तुन्हा बापुले भज्या आवडतीस!’… असा संवाद ती साधायची.. ढेकर देईपर्यंत आम्ही जेवण करायचो.. टोपलीत एक दोन पुरणपोळी उरलेली असायची.. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पुरणपोळीचा आई डालडा तूप टाकून मस्तपैकी ‘काला’ करायची.. आणि आम्हा भावंडांना खाऊ घालायची.. तिची न्यारीच चव आजही तोंडात जशीच्या तशी आहे..
अशा पुरणपोळीची सर मात्र आजच्या 60-70 रुपयाच्या बाजारू पुरणपोळी ला कधीच येऊ शकत नाही.. कारण त्या पुरणपोळीत हायब्रीड हरभरा डाळ, केमिकल युक्त गुळ असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आईच्या प्रेमाची कमतरता असते..
शब्दाकंन
—शरद मिराबाई भिका पाटील
उपशिक्षक विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर

