साधी राहणी, उच्च विचारांचा वारसा… कै एस.एल.पाटील यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ स्मरण
![]()
साधी राहणी, उच्च विचारांचा वारसा… कै एस.एल.पाटील यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ स्मरण
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी ही भूमी केवळ सुपीक नाही तर ज्ञानाचे बीज रोवणारी पवित्र जन्मभूमीही ठरली. कारण याच मातीतून जून 2000 मध्ये महात्मा फुले हायस्कूल उभारून हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दरवाजा उघडणारे, मितभाषी, आदर्श शिक्षक व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. बापूसाहेब एस. एल. पाटील उदयास आले.
२० ऑगस्ट ही तारीख म्हणजे त्यांचा जयंतीदिन – साधेपणाच्या महाकाय पर्वाची आठवण करून देणारा दिवस.
*साधेपणात मोठेपणा*
बापूसाहेबांचा स्वभाव अत्यंत साधा, सरळमार्गी आणि मितभाषी होता. त्यांच्या वागण्यात कधीही दिखावा नव्हता. ते आपल्या रोजच्या प्रवासासाठी सायकलचाच आधार घेत. पद, प्रतिष्ठा, गौरव यांचा त्यांना कधी मोह नव्हता. कोणीतरी ‘रामराम’ करावा अशी अपेक्षा त्यांनी कधी ठेवली नाही. उलटपक्षी, स्वतःच्या शाळेजवळून जातानाही ते आत शिरायचे नाहीत. फक्त एकच वाक्य नेहमी कानावर घुमायचं –
👉 “विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवा… पण माझ्याकडे तक्रार आणणार नाही, याची काळजी घ्या!”
*शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य*
“साधी राहणी, उच्च विचारसरणी” या तत्त्वाचा त्यांनी जीवनभर अवलंब केला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. देवगाव हायस्कूल विनाअनुदानित असतांना बापूसाहेब स्वतः अध्यापनाच्या कार्यात रमले. त्यांच्या कर्तृत्वामुळे वारुळ परिसरातील अनेक शाळांमध्ये उपक्रमशील वातावरण निर्माण झाले.
*निधनानंतर निर्माण झालेली पोकळी*
बापूसाहेबांच्या अकाली निधनानंतर शैक्षणिक क्षेत्रात आणि देवगाव परिसरात एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या अनुपस्थितीने प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आणि पालक अंतःकरणाने हळवे झाले. पण त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा आजही तितकाच जिवंत आहे.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांना केवळ आठवावे असे नाही, तर त्यांच्या आदर्शांची शिकवण पुढे नेण्याचा संकल्प करावा, हेच खरे अभिवादन ठरेल.
💐 कै. बापूसाहेब एस. एल. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम 💐


ईश्वर आर. महाजन(पत्रकार)
उपशिक्षक
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव
ता. अमळनेर, जि. जळगाव
📞 9860352960
—क्षणचित्रे


