अतिवृष्टीने हिंगोणे खुर्द शेतकऱ्याचे तीन एकर कपाशी वाहून – श्रम, स्वप्न आणि आशा पाण्यात
1 min read

अतिवृष्टीने हिंगोणे खुर्द शेतकऱ्याचे तीन एकर कपाशी वाहून – श्रम, स्वप्न आणि आशा पाण्यात

Loading

अतिवृष्टीने हिंगोणे खुर्द शेतकऱ्याचे तीन एकर कपाशी वाहून – श्रम, स्वप्न आणि आशा पाण्यात

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द गावातील शेतकरी गुरुदास एकनाथ पाटील यांचे या वर्षीचे सारे कष्ट आणि स्वप्न क्षणात चुरडून गेले.
मे महिन्यातच तीन एकर शेतात कपाशीची लागवड केली होती. भरपूर मेहनत घेऊन खतपाणी, औषध, मेहनत मजुरीसह जवळपास ४५ ते ५० हजार रुपये खर्च झाले होते. शेतातले पीक जोमाने वाढत होते. हिरवाईने नटलेले शेत पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतही आशेचा किरण चमकू लागला होता – “यावर्षी चांगले उत्पन्न येईल, आपण कर्जमुक्त होऊ” अशी खात्री मनाशी बांधली होती.
मात्र नशिबाने वेगळाच खेळ केला. काही दिवसांपूर्वी अचानक आलेल्या अतिवृष्टीच्या पावसाने क्षणात शेतातील संपूर्ण कपाशी वाहून गेली. हिरवाईचा शेतातील गालिचा पाहता पाहता पाण्याने गिळंकृत केला. हजारो रुपये खर्चून, रात्रंदिवस मेहनत करून जे पीक तयार झाले होते, ते क्षणात नष्ट झाले.
शेतकरी गुरुदास पाटील यांचा संसार आता हताश व चिंतेत बुडाला आहे. हातात काही आले नाही, उलट मोठा तोटा झाला. आधी पाऊस नव्हता, शेतकरी आसुसून ढगांकडे पाहत होता. पण जेव्हा पाऊस आला, तेव्हा अतिवृष्टीने डोळ्यातले अश्रूही राहू दिले नाहीत.
आज केवळ गुरुदास पाटीलच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातले पीक नष्ट झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त अवस्थेत आहे.
ग्रामीण भागातून आवाज उठू लागला आहे – “शासन शेतकऱ्यांच्या वेदना कितपत ओळखणार? एवढ्या मोठ्या तोट्याची भरपाई शासन करू शकेल का?”
तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या हाती तात्काळ आर्थिक मदत यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी संघटनांकडून होत आहे.
शेतकऱ्याच्या हातची माती, घाम, श्रम आणि आशा हे सर्वच पावसाच्या पाण्याने वाहून गेले… पण शासनाची मदत आणि आधार हा त्यांचा नवा दिलासा ठरू शकेल का, याकडे संपूर्ण शेतकरी समाज डोळे लावून बसला आहे.

One thought on “अतिवृष्टीने हिंगोणे खुर्द शेतकऱ्याचे तीन एकर कपाशी वाहून – श्रम, स्वप्न आणि आशा पाण्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *