स्वातंत्र्यात खरी लोकशाही हवी स्वैराचार नव्हे !* ==================================== *संजय एम.देशमुख (निंबेकर)* *ज्येष्ठ पत्रकार, अकोला, मोबा.९८८१३०४५४६*
![]()
*स्वातंत्र्यात खरी लोकशाही हवी स्वैराचार नव्हे !*
====================================
*संजय एम.देशमुख (निंबेकर)*
*ज्येष्ठ पत्रकार, अकोला, मोबा.९८८१३०४५४६*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आमचा देश स्वतंत्र झाला,आणि आज आम्ही हा ७९ वा स्वातंत्र्यदिन आणि त्याच स्वातंत्र्याचा हा ७८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. गेल्या ७८ वर्षात देशाने सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली.त्याला आपण भौतिक विकास म्हणू. ज्ञान,विज्ञान,शिक्षण,तंत्रज्ञानाने विकासाची उच्चतम दालने उघडली गेली संधीचे सोने करण्याच्या दिशा दाखविल्या.अनेक वर्षे पारतंत्र्याच्या अंध:कारात चाचपडणारा आमचा हा देश असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून अखेर स्वतंत्र झाला.त्यांच्या त्यागाच्या,हाल अपेष्टांच्या विदारक कहाण्यांनी भारताचा ईतिहास लिहिल्या गेला.अथक प्रयत्नांनी,पराक्रमांच्या पराकाष्टांनी,नैतिक आदर्शांच्या बळासमोर परकीय शक्ती नाकाम झाल्याने स्वातंत्र्य मिळाले.म्हणून भारतिय ईतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहला गेलेला उच्चतम आनंदाचा हा दिवस सारा देश मोठ्या अभिमानाने साजरा करीत असतो.याच स्वतंत्र देशामध्ये लोकशाहीचे संवर्धन आणि संविधानाचे रक्षण करीत हातात हात घेऊन विकासाची वाटचाल हिच स्वातंत्र्याच्या ध्वजाला दिलेली खरी मानवंदना ठरेल!
आपल्या आयुष्यात आलेले सुख,समृध्दी,आनंद आणि सुलभ जीवनमानाचे क्षण हे कुणाच्या तरी त्यागातून ,कठोर कर्मसाधनेतून आलेले असतात. त्याप्रती कृतज्ञता बाळगणे हे स्वत:ची माणूस म्हणून ओळख देणाऱ्या माणसातल्या प्रत्येक माणसाला असली पाहिजे.त्या भूतकाळातील कर्मयोग्यांच्या तपस्यांना कृतज्ञतापूर्वक साक्ष ठेऊन समुह जीवनातील वाटचाल असली पाहिजे.या संस्काराच्या पालनातून कोणत्याही क्षेत्रातील प्रत्येक माणसाचा नैतिक कर्तव्याचा प्रवास असला पाहिजे.हेच येथील भारतमातेच्या स्वरूपातील स्वातंत्र्यदेवतेला अभिप्रेत आहे.आयुष्यभर संसार आणि आपल्या मुलांचे भवितव्य साकारण्यासाठी धडपडणाऱ्या माता पित्यांना आपली मुले कशी असावित,कशी रहावित समाज आणि मातापित्याप्रती त्यांच्या भावना कशाप्रकारे समर्पित असाव्यात, या भावभावनांचे एक वेगळे चित्र अपेक्षित असते.त्याचप्रमाणे या भारतमातेलाही येथील लोकशाही समृध्द होण्यासाठी,तिच्या सूपूत्रांच्या सुलभ जीवनमानाच्या हक्क संरक्षणासाठी राजकीय,सामाजिक आणि सर्वच क्षेत्रात नागरीकत्वाची कर्तव्ये पार पाडणारे शिस्तीचे सूपूत्र अपेक्षित आहेत.लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी संविधानाच्या कवचाला अधिक टणक करणारे कर्तव्यवादी देशभक्त हवे आहेत..! परंतू स्वातंत्र्याचा मतितार्थ समजून घेतला जात नाही. त्यानुसार आचार तर दुरच स्वातंत्र्यातील लोकशाहीचा अनादर आणि संविधानाचे अवमुल्यण करीत स्वैराचार सुरू आहे.
देशाच्या भौतिक विकासाची गगणभरारी घेतांना आकाशातून खाली पाहणेही तेवढेच आवश्यक आहे.कारण या विकासाची नाळ ही येथील श्रमिक, कष्टकरी, शेतकरी,नोकरदार आणि सर्वसामान्न्य नागरीकांशी जोडलेली आहे.अनेक वर्षापासून येथील देशातील बेरोजगारी आणि गरीबीचे समुळ उच्चाटण होत नाही.बेरोजगारांच्या हातांना काम मिळत नाही.श्रमिकांचे,शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारत नाही आणि महागाई कमी श्वास काढू देत नाही.शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहून राजकारण्यांच्या कठोर हृदयांना पाझर फुटत नाहीत.त्या थांबल्या पाहिजेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची उपरती सुध्दा कुणाला होऊ नये हे या स्वतंत्र भारतातील एक मोठे आश्चर्य आहे..नानाविध भरमसाठ करांच्या भडीमाराने कंबरडे मोडणाऱ्या,त्यातच पिचल्या जाणाऱ्या सर्वसामान्न्याच्या जीवनात सुखाचा,आनंदाचा प्रकाश कधी निर्माण होणार? जोपर्यंत या सर्व घटकांना ग्रासणाऱ्या विदारक परिस्थितीत बदल होत नाहीत,तोपर्यंत भारतमातेच्या येथील या सूपूत्रांसाठी, देशाच्या या नागरीकांसाठी मिळालेल्या स्वातंत्र्याचा फारसा उपयोग झालेला नाही असेच खेदाने म्हणावे लागेल.विकासाची किरणं येथील बहूतांश घरात पोहचलीच नाहीत. लोकशाहीच्या वृक्षाची फळे ईतरांनीच पळवली.खऱ्या गरजवंतांना ती मिळालीच नाहीत.आर्थिक विषमतेच्या विवरातील हा अंध:कार पाहून आज समाजमने अस्वस्थ आहेत,अशांत,अस्थिर आहेत.नव्हे देशातील नागरीक आज हेच दु’खाचे बोल बोलत आहेत.
आज देशाला परकीय शक्तींचे धोके निर्माण झालेले आहेत.नियोजन आणि दुरदृष्टी अभावी नेसर्गिक आपत्तींनी अनेक माणसांचे बळी जात आहेत.देशांतर्गत जीवनमानाचे प्रश्न टोकाला पोहचत आहेत.अनंत समस्यांच्या भस्मासूराशी दोन हात करतांनाच दुसरीकडे राजकीय क्षेत्र आणि स्वायत्त संस्था तथा न्यायव्यवस्थाही संशयाच्या गर्तेत सापडलेल्या आहेत.राजकीय क्षेत्रातून
प्रामाणिकता,नैतिकता लोप पावत असून मतदारांच्या मतांचे दुरुपयोग होत आहेत. त्यांच्या अधिकारांना ग्रहण लावण्याच्या अविश्वसनिय करामतींच्या चक्रव्यूहात हा देश अडकल्याचे सबळ संशय थैमान घालत आहेत.आज लोकशाही हेलकावे खात आहे.संविधानाच्या शपथा घेणाऱ्यांनीच संविधानाशी प्रतारणा करणे म्हणजे हा या स्वतंत्र भारतातील भिषण दैवदुर्विलास आहे.या स्वतंत्र भारत देशात असं काही घडेल याची या देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल.स्वत: जगा आणि ईतरांनाही जगवा हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे.महत्प्रयासाने मिळविलेल्या स्वातंत्र्यात अधिकारांचा गैरवापर करून नागरीकांना आपलीच माणसे परकी वाटू नये.पारतंत्र्याच्या अनुभूती येऊ नयेत.स्वातंत्र्याचं महत्व समजून त्या संधीचे सोने करता आले पाहिजे.या उदात्त कर्तव्याची उपरती या देशातील राजकीय नेत्यांना आणि सत्ताधाऱ्यांना व्हावी.कर्तव्य आणि नैतिक आचारांना बगल देऊन स्वैराचार बोकाळू नये याबाबत दक्षता घेण्याचा सुज्ञपणा हा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करतांना अंगी बाणवला पाहिजे.तिच येथील राष्ट्रध्वजाला दिलेली खरी मानवंदना ठरेल…!

