हर घर तिरंगा अभियानांतर्गत अंधेरीत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली
![]()
हर घर तिरंगा अभियानांतर्गत अंधेरीत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली
(मुंबई – विशेष प्रतिनिधी उदय नरे)
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान देशभर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व विभागांत विविध देशभक्तिपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळांमार्फत ‘हर घर तिरंगा’ यात्रांचे आयोजन केले जात आहे. त्याच अनुषंगाने अंधेरीतील डी.एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीत डी.एन. नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन आणि शाळेच्या शिक्षिका सौ. अश्लेषा सुतार उपस्थित होते. रॅलीचे नेतृत्व सौ. सुतार यांनी केले. मुख्याध्यापक श्री. श्रीनिवासन यांनी विद्यार्थ्यांना देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची व देशरक्षणाची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.
‘हर घर तिरंगा’ अभियान २०२२ पासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू झाले असून आता ते देशव्यापी लोकचळवळ बनले आहे. महाराष्ट्र राज्य आणि मुंबई महानगराने या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाही १५ ऑगस्टपर्यंत हे अभियान मोठ्या उत्साहात राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबईतील सर्व वॉर्डांत तिरंगा महोत्सव, तिरंगा मेळा, सांस्कृतिक कार्यक्रम, बाईक व सायकल रॅली, तिरंगा दौड, गॅरेथॉन, तिरंगा प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, तिरंगा राखी व विणकाम स्पर्धा, पत्रलेखन अभियान, प्रश्नमंजुषा, तसेच स्वच्छता मोहिमा आयोजित केल्या जात आहेत.
मुंबईकरांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, तिरंग्यासोबत सेल्फी, छायाचित्र किंवा व्हिडिओ घेऊन https://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे आणि स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

