घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी ठाणे पोलिसांच्या ताब्यात : १० लाख ४० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
![]()
घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी ठाणे पोलिसांच्या ताब्यात :
१० लाख ४० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
ठाणे: कल्याण
(मनिलाल शिंपी) :
राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाटा कंपाऊंडमधील श्री सिध्दनाथ मार्केटिंग या डिस्ट्रीब्यूटर कंपनीचे गोडावून दि. १५ जुलैला पहाटे फोडून चोरट्यांनी ५१ लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याबद्दल राबोडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या घरफोडीची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक १ ठाणे यांच्याकडूनही करण्यात येत होता. आरोपींनी गुन्हा करतेवेळी पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने गोडावूनमधील डीव्हीआर मशीनही चोरुन नेले होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गुन्ह्यात एकूण ४ आरोपी निष्पन्न करण्यात आले.
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली स्कूटर, मोटारसायकल व चोरीचा माल घेऊन जाण्यासाठी वापरलेला टेम्पो यांचा माग काढत असतांना, गुन्ह्यात वापरलेली वाहने त्याच परिसरातून चोरी झाली असल्याचे तपासात आढळून आले. आरोपित ज्या दिशेने आले त्या भागाताली सीसीटीव्ही फुटेजची गुन्हे शाखा घटक १ चे सपोउपनिरी दयानंद नाईक, पोहवा संदीप महाडीक यांनी बारकाईने पडताळणी केली. पोशि सागर सुरळकर यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये आरोपी गुन्हा केल्यानंतर मीरारोड परिसरात गेल्याचे आढळून आले.
आरोपीत यांचे तत्कालीन राहण्याचे ठिकाण निष्पन्न झाले परंतु फरार आरोपींचा शोध घेणे आव्हानात्मक होते. अखेरीस गुन्ह्यातील मुद्देमालाची विक्री करण्यासाठी मदत करणारा राजस्थान राज्यातील गुन्ह्यातील पाचवा साथीदार गणेश धुला पाटील (वय ४७, रा.ग्राम पाडवा, ता.सागोडा, डुंगरपूर, राजस्थान) याचा शोध लावून गुन्ह्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी महेंद्रकुमार थानाराम मेधवाल (वय २८, होली चौक, सुमेरपूर, पाली, राजस्थान), राजेश उर्फ अण्णा बबन कदम (वय ४७, रा. ८०६, परशुराम बिल्डींग, बी विंग, चारकोप, कांदिवली प. मुंबई) हे दोघे. असे ३ आरोपीं सदर गुन्ह्यात २९ जुलै रोजी अटक करण्यात आली. पुढील तपास गुन्हे शाखा घटक १ चे पोउपनिरी दिपक घुगे करत आहेत.

