केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथे ‘भारतीय ज्ञान परंपरा’ विषयावर डॉ. योगेश पाटील यांचे व्याख्यान
1 min read

केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथे ‘भारतीय ज्ञान परंपरा’ विषयावर डॉ. योगेश पाटील यांचे व्याख्यान

Loading

केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथे ‘भारतीय ज्ञान परंपरा’ विषयावर डॉ. योगेश पाटील यांचे व्याख्यान

अमळनेर प्रतिनिधी

भारत सरकार शिक्षा मंत्रालय विभाग केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथे श्रीलंकेहून आलेल्या हिंदी शिक्षकांसाठी सुरू असलेल्या रिफ्रेशर कोर्स अंतर्गत ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर खोकरपाट ता अमळनेर येथील रहिवासी तसेच विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख डॉ. योगेश पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानाचे संचालक डॉ. सुनील बाबुराव कुलकर्णी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभाग प्रमुख डॉ. हुकूमचंद मीना, तसेच आंतरराष्ट्रीय हिंदी विभागाचे डॉ. पुरुषोत्तम पाटील, संयोजन डॉ. रेणू चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

डॉ. योगेश पाटील यांनी आपल्या व्याख्यानात समृद्ध भारतीय ज्ञान परंपरेची वैशिष्ट्ये उलगडून दाखवली. त्यांनी वेद, उपनिषदे, आयुर्वेद, योग, गणित, खगोलशास्त्र, न्यायशास्त्र, नीतिशास्त्र, शिल्पकला, संगीत, साहित्य आणि गुरुकुल परंपरा यांचा समावेश करत भारताच्या समृद्ध प्राचीन ज्ञान परंपरेची सखोल माहिती दिली. परंपरा या शब्दाचा विशेष अर्थ सांगताना ते म्हणाले की परंपरा हा शब्द जरी साधारण वाटत असला तरी तो अत्यंत असाधारण असा आहे. परंपरा ती असते जी आपल्याला भूतकाळातून मिळते, जी वर्तमानाची निर्मिती करते व उज्वल भविष्याकडे घेऊन जाते ती खऱ्या अर्थाने परंपरा असते. वर्तमान काळात जे अनुपयोगी आहे ती कधीही परंपरा असू शकत नाही. यावेळी गुरु शिष्य परंपरा तसेच भारतीय संत परंपरा कशी मानवतावादी आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. पुढे ते म्हणाले की तक्षशिला हे जगातील पहिले विद्येचे केंद्र मानले जाते. तसेच नालंदा हे जगातील पहिले आधुनिक पद्धतीने रचलेले निवासी विद्यापीठ मानले जाते. येथे अनेक देशांमधून लोक धर्म, बौद्ध तत्त्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र व तर्कशास्त्र इ. विषयाच्या अभ्यासाठी येत होते असे त्यांनी सांगितले त्यांनी वेद-उपनिषदांमधील आत्मा, ब्रह्म, मोक्ष यांसारख्या तत्त्वज्ञानाचे स्पष्टीकरण दिले. तसेच पतंजली योगसूत्रे, चरक व सुश्रुत संहितेतील आयुर्वेद, आणि आर्यभट्ट व भास्कराचार्य यांचे खगोलगणितातील योगदान अधोरेखित केले. ‘वसुधैव कुटुंबकम्’, ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ यांसारख्या मूल्यांमधून भारतीय परंपरेतील सहिष्णुता, समता आणि वैश्विक दृष्टिकोन स्पष्ट होतो, असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ सुनील कुलकर्णी त्यांनी सांगितले की, आज संपूर्ण जग भारताच्या योग, आयुर्वेद, संस्कृत आणि तत्त्वज्ञानाकडे आशेने पाहत आहे. म्हणूनच भारतीय ज्ञान परंपरेचा जागतिक स्तरावर जागर करणे ही काळाची गरज आहे. श्रीलंका येथून आलेल्या हिंदी शिक्षकांनी आपल्या मनोगतात क्रेंद्रीय हिंदी संस्थानच्या माध्यमातून हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यसाठी ज्या विविध योजना आहेत त्यांचा लाभ आम्हाला होतो , श्रीलंकेतील विद्यार्थ्यांना हिंदी साहित्यातील कथा व कविता वाचायला आवडतात. हिंदी विषयाचे अध्यापन करण्यासठी अत्यंत उपयुक्त असे प्रशिक्षण आम्हाला याठिकाणी मिळाले असे त्यांनी सांगितले.

प्रस्तावना संयोजक डॉ. रेणू चौधरी यांनी केले. व्याख्यानास श्रीलंकेहून आलेले शिक्षक, संस्थेतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी भारतीय ज्ञान परंपरेबाबत नव्या दृष्टिकोनाने विचार करण्याची प्रेरणा घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *