ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे कालिदास दिवस साजरा
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे कालिदास दिवस साजरा
जळगाव प्रतिनिधी – ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात दिनांक २६/०७/२०२५ रोजी ‘कालिदास दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती व साहित्याचे महान रत्न, महाकवी कालिदास यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे व प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पुनम कोल्हे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना कालिदास यांच्या साहित्यिक कार्याची महती सांगितली. त्यांनी ‘अभिज्ञान शाकुंतलम्’, ‘मेघदूत’, ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’ यांसारख्या कालिदास यांच्या अजरामर काव्यांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना संस्कृत साहित्यातील वैभवाची ओळख करून दिली.
विद्यार्थ्यांनी कालिदास यांच्या काव्यांवर आधारित नाट्यछटा, भाषणे, कविता सादरीकरण, तसेच श्लोक वाचन यांसारखे मनोवेधक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे तसेच संस्कृत विषयाचे शिक्षिक श्री. वेदप्रकाश गडदे व श्री. महेंद्र मिरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन श्री.निर्मल चतुर यांनी केले, कार्यक्रमाचे यशस्वी संचालन वर्ग १० वी तील विद्यार्थी गिरीश सोनवणे, करण पाटील, कार्तिक पवार, ओम महाजन, कु. भाग्यश्री पाटील, कु. चातुर्या सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना कालिदास यांच्या साहित्याचे महत्त्व, त्यातील नैतिकता व निसर्गप्रेम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी अभिमान निर्माण करणारा ठरला. उपस्थित पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.

