अनिल शेजवळ सारख्या एका लढवय्या गिर्यारोहक, कबड्डी तज्ज्ञ,स्पष्टवक्ता शिक्षकाची सेवानिवृत्ती!
![]()
अनिल शेजवळ सारख्या एका लढवय्या गिर्यारोहक, कबड्डी तज्ज्ञ,स्पष्टवक्ता शिक्षकाची सेवानिवृत्ती!
कल्याण( मनिलाल शिंपी)
एका लढवय्या गिर्यारोहक, कबड्डी तज्ज्ञ, स्पष्टवक्ता व निडर क्रीडा शिक्षकाची सेवानिवृत्ती!*
खेळाडूंमधील क्रीडागुण शोधक, कबड्डी खेळातील राष्ट्रीय पंच, संघटना पातळीवर नियमांची कास धरून निर्णायक भूमिका मांडण्याची धडाडीवृत्ती, खोल दरीत पडून अपघात झाला की अपघातग्रस्त लोकांचा जीव वाचवणारा देवदूत, अर्थात माझे प्रिय मित्र श्री. अनिल संभाजी शेजवळ! आम्ही सर्वच क्रीडा शिक्षक त्यांना प्रेमाने अनिल सर असे संबोधतो.
अनिल सरांचा आणि माझा सुमारे ३५ वर्षांपासूनच परिचय. सुरुवातीला त्यांचे कबड्डी खेळातील काम मी दुरून बघायचो. त्यांच्यातील धडाडीवृत्ती मला अधिक भावली. पुढे आम्ही शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून क्रीडांगणावर भेटायचो. काही वर्षांनंतर एकविध क्रीडा संघटनांचे जाळे क्रीडा शिक्षकांपर्यंत येऊ लागले. आणि Atya -Patya खेळाची ठाणे जिल्ह्याची सुरुवात करताना मार्गदर्शनासाठी सर्वात पहिली भेट मी अनिल सरांची.
अनिल सर, हे मुळातच कबड्डी खेळाडू व प्रशिक्षक! कल्याण शहरातील दानशूर उद्योजक स्वर्गीय मोहिंदरसिंग काबालसिंग यांनी मोहिंदरसिंग काबालसिंग इंग्लिश स्कूल मध्ये अनिल सरांना शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून सेवा करण्यासाठी संधी दिली. अनिल सरांनी संधीचे सोने करत आपल्या कामातून मोहिंदरसिंग काबालसिंग अर्थात अंकलजींचा विश्वास संपादन केला.
शालेय क्रीडा स्पर्धा असो की क्रीडा संघटना अनिल सरांचे नेहमीच खटके उडत. कारण अनिल सरांचा स्पष्टवक्तेपणा कामाचा देखावा करणाऱ्या लोकांना तापदायक वाटायचा. त्यामुळे इतरांकडून अनिल सरांना क्रीडा क्षेत्रात थोडे दूर ठेवले गेले.
*व्रतधारी शिवभक्त* महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या प्रत्येकाला प्रेरणादायी तसेच अनिल सरांसाठी सुद्धा! त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धनाचा विडा त्यांनी हाती घेतला. त्याचप्रमाणे जो पर्यंत शरीरात जीव असेपर्यंत तिथीप्रमाणे शिवजयंतीला शिवनेरी आणि पुण्यतिथीला रायगड हे व्रत त्यांनी घेतले.
अशा या व्रताधारी शिवभक्त मा. श्री. अनिल संभाजी शेजवळ सरांना सेवानिवृत्तीचा निमित्ताने कल्याण तालुका शारीरिक शिक्षक शिक्षण मंडळ, सर्व क्रीडा प्रेमी, खेळाडू यांच्यातर्फे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आदर्श क्रीडा संघटक अंकुर आहेर सर यांनी शेजवळ सरांना पुढील आयुष्यात उत्तम व निरोगी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

